मेट्रो रेल्वेने मालमत्ता थकबाकी न भरल्यास कारवाईचा बडगा

कारवाईसाठी गेलेल्या पथकाकडून २ दिवसांची मुदत, मेट्रो रेल्वे अधिकाऱ्यांकडून कारवाई न करण्याबाबत विनंती

MLA Raees Sheikh alleges that corruption is taking place in Mumbai Municipal Corporation

मुंबई -: मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता कर थकबाकीची वसुली करण्यासाठी गुरुवारी मेट्रो रेल्वे -१ ( घाटकोपर ते वर्सोवा) वर कारवाईसाठी धडक दिली. मात्र मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी विंनती केल्याने थकबाकी भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. मात्र त्यानंतरही जर मेट्रो रेल्वे व्यवस्थानने वेळकाढूपणा केल्यास पालिकेकडून त्यांच्या मालमत्तांवर म्हणजे कार्यालये, रेल्वे स्थानक येथील पाणीपुरवठा, मलनि:सारण वाहिनी खंडित करण्याची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे वर्षभरात ६ हजार कोटींचा मालमत्ता कर वसुली करण्याचे लक्ष्य आहे. मात्र गेल्या दोन वर्षात मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव असल्याने पालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे गणित बिघडले. परिणामी ६ हजार कोटी रुपयांपैकी ४ हजार ८५२ कोटी रुपयांची वसुली करण्यात पालिकेला यश आले. मात्र उर्वरित १ हजार १४८ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका मार्च अखेरपर्यन्त जोमाने प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही, सर्वसामान्य कर दात्यांवर मालमत्ता कर थकबाकीसाठी तगादा लावणारे पालिकेचे संबंधित अधिकारी मात्र मुंबईतील नामांकित बिल्डरांकडील कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसुली करण्यात चालढकलपणा करतात. त्या बिल्डरांना पाठीशी घालतात, असा आरोप केला होता.

आता पालिका कर निर्धारण व संकलन खाते खडबडून जागे झाले असून थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारून कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसुली करण्याच्या प्रयत्नांत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी पालिकेचे काही अधिकारी २२० कोटींचा मालमत्ता कर थकविणार्या ‘मेट्रो वन’ कडे कारवाईसाठी गेले होते. त्यावर मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तूर्तास कारवाई करू नका, ‘आम्हाला दोन दिवसांची मुदत द्या’, अशी विनंती करून गयावया करू लागले. त्यामुळे अखेर पालिकेने त्यांना दोन दिवसांची मुदत दिल्याचे समजते. मात्र जर दिलेल्या अवधीत मेट्रो रेल्वे व्यवस्थानने पालिकेची थकबाकी न भरल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणे अटळ आहे.