घरCORONA UPDATE...तर मुंबईत संपूर्ण इमारतच होणार सील!

…तर मुंबईत संपूर्ण इमारतच होणार सील!

Subscribe

मुंबईत झोपडपट्टीमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊन इमारती आणि सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरु लागल्याने महापालिका आता पुन्हा एकदा इमारती सील करण्याचा विचारात आहे. सध्या ज्या इमारतीतील मजल्यावर रुग्ण आढळून येतो, तो मजला सील केला जातो. परंतु इमारतींमधील नागरिक आता या आजाराबाबत गंभीर नसल्याने तीन पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारतच सील करून बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा विचार केला जात आहे.

मुंबईतील काही वरळी, दादार, भायखळा, घाटकोपर, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, कांदिवली, भांडुप आदी भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आता कमी प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. परंतु पूर्वीच्या तुलनेत आता झोपडपट्टींमध्ये हे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अवघे पाच टक्क्यांवर आले आहे. तर उर्वरीत सर्व रुग्ण हे इमारती व मेाठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे झोपडपट्टीच्या तुलनेत इमारती व मोठ्या गृहनिर्माण सोसायट्याच कोरोनाचे अड्डे बनताना दिसत आहे. महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी झोपडपट्टीत जेव्हा या आजाराचा संसर्ग झाला तेव्हा ती पूर्ण वस्ती कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करत तेथील लोकांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. परंतु जेव्हा झोपडपट्टीत कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते, तेव्हा इमारतींमधून असे मिळण्याचे प्रमाण नगण्य होते. अर्थात इमारतीतील लोक त्यावेळी बाहेर पडत नव्हते. मात्र, झोपडपट्टीत हा आजार पसरल्याने तेथील लोकांची प्रतिकार शक्ती वाढली. ज्यामुळे त्यांना आज धोका नाही. परंतु इमारतीतील लोक आता कामधंद्यासाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्यात या विषाणूचा संसर्ग होत आहे. विशेष म्हणजे आज ७० ते ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे कुठला रुग्ण पॉझिटिव्ह आहे किंवा त्याला बाधा झाली आहे, हे चाचणी केल्याशिवाय समजत नाही.

- Advertisement -

कांदिवली, बोरीवली, दहिसरमध्ये सर्वाधिक रुग्ण

सध्या उत्तर मुंबईतील कांदिवली, बोरीवली आणि दहिसर या तीन विभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर सुरुवातीच्या काळात ज्या भागात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून येत होते, त्या मलबारहिल, ग्रँटरोड या विभागातही पुन्हा इमारतींमध्येच रुग्ण आढळू लागले. परिमंडळ ७मधील कांदिवली, बोरीवली व दहिसर या तिन विभागांमध्ये याची सर्व प्रथम अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. झोपडपट्टी भागाला कंटेन्मेंट झोन जाहीर करून संपूर्ण वस्तीला क्वारंटाईन केले जायचे. त्याच धर्तीवर इमारतीतील रहिवाशांनाही संपूर्ण इमारत सिल करून क्वारंटाईन केल्यास या इमारतींमधून पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल, असे बोलले जात आहे. त्यामुळेच आता इमारतीच्या मजल्यांऐवजी संपूर्ण इमारत सील करण्यावर भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

परिमंडळ ७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विभागात अशा प्रकारची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या इमारतींमध्ये तीन पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील, त्या इमारती किंवा विंग संपूर्ण सील केल्या जाणार आहेत. रुग्णांसोबत राहणारी इतर मंडळीही पॉझिटिव्ह होतात तसेच क्वारंटाईन केलेली मंडळी याची विशेष काळजी घेताना दिसत नाही. त्यामुळे काही कडक नियम राबवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -