घरCORONA UPDATEखासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आता महापालिकेच्या ताब्यात

खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आता महापालिकेच्या ताब्यात

Subscribe

खासगी रुग्णालयांमधील खाटांचे नियोजन, वाटप आणि संनियंत्रण हे केंद्रीय पद्धतीने आणि शासकीय स्तरावर होणे गरजेचे असल्याने सर्वांना समान पद्धतीने खाटा वाटप व्हाव्यात, याकरिता खाजगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा राज्य शासनाद्वारे निर्धारित करण्यात येणाऱ्या दरांनुसार आणि संबंधित अटी व शर्तीनुसार उपयोगात आणण्यात येणार आहेत. या खाटा सध्या निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणात कोविड बाधित आणि कोविडची बाधा नसलेल्या रुग्णांसाठीही केंद्रीय पद्धतीने वाटप करून उपयोगात आणण्यात येणार आहेत. त्यामुळे हृदयविकार तसेच इतर काही आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी या खाटा मिळणार असून यामाध्यमातून त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळू शकतील.

मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सहआयुक्त रमेश पवार, उपायुक्त चंद्रशेखर चोरे तसेच या अनुषंगाने समन्वयक म्हणून भूमिका पार पाडणारे ‘बॉम्बे हॉस्पिटल’चे डॉक्टर गौतम भन्साली यांच्यासह मुंबईतील विविध खाजगी रुग्णालयांचे ज्येष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीदरम्यान ‘कोविड १९’ बाधा असलेले रुग्ण आणि कोविडची बाधा नसलेले रुग्ण यांच्यावरील उपचारांबाबत खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधितांद्वारे महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आली. तर शासनाच्या निर्देशांनुसार सर्व खासगी रुग्णालयातील एकूण खाटांपैकी ८० टक्के खाटा या शासन निर्धारित दरांनुसार उपयोगात आणण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या खाटांचे सध्याच्या प्रमाणानुसार कोविडची बाधा असलेल्या रुग्णांना आणि कोविड नसलेल्या रुग्णांना केंद्रीय पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे. यानुसार शासनस्तरावर दर पत्रक आणि संबंधित अटी व शर्ती निर्धारित करण्यात येत आहेत. याबाबत प्राप्त होणाऱ्या आदेशांनुसार तात्काळ पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी या बैठकीच्या निमित्ताने उपस्थितांना दिली.

खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे आयुक्तांचे लक्ष

‘कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉक-डाऊन’मुळे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर मनुष्य बळास रुग्णालयात पोहोचण्यास अडचणी येत असल्याचे खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधीनींनी आयुक्तांना सांगितले. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांच्या स्तरावर येत असलेल्या विविध अडचणींची माहिती देखील खाजगी रूग्णालयाच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांकडे सादर केली. या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने विविध संभाव्य पर्यायांचा विचार करणार असल्याचे महापालिकेच्या वतीने याप्रसंगी नमूद करण्यात आले. तसेच शासनाच्या स्तरावर याबाबतच्या अटी व शर्ती आणि दरांची निश्चिती झाल्यानंतर याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल, असेही आजच्या बैठकीदरम्यान महापालिकेद्वारे नमूद करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -