घरताज्या घडामोडीभांडुप, विक्रोळी येथील डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा

भांडुप, विक्रोळी येथील डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा

Subscribe

सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे पालिकेचे आवाहन

पूर्व उपनगरातील ‘एस’ विभागातील भांडुप, विक्रोळी (पश्चिम) परिसरातील डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची आणि त्यामध्ये जीवित वा वित्तीय हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने जागा खाली करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
पालिकेने केलेल्या आवाहनाची गंभीर दखल न घेणाऱ्या आणि स्थलांतरीत न होणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्यास मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे सहाय्यकआयुक्त विभास आचरेकर (‘एस’ विभाग) यांनी कळविले आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात डोंगर भाग असलेल्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या लहान, मोठ्या दुर्घटना घडत असतात. त्यामध्ये काहीवेळा जीवित आणि वित्तीय हानी ही कमी-अधिक प्रमाणात होत असते. अशा दुर्घटना घडल्या की, साहजिकच स्थानिक प्रशासन म्हणून मुंबई महापालिकेकडे बोट दाखवले जाते. तर मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना, अशा दुर्घटना घडल्या की आपली कातडी वाचवायची असते.

- Advertisement -

वास्तविक, दरड कोसळण्याच्या दुर्घटना पाहता सरकार आणि पालिकेने या प्रकरणी एक ठोस धोरण बनविणे अपेक्षित असते. मात्र तसे काही घडत नाही. त्यामुळे अशा विषयावरील भिजते घोंगडे कायम आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनसुद्धा, आपली कातडी वाचविण्यासाठी डोंगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना केवळ सतर्क करण्यासाठी लेखी नोटीस पाठविण्याचे काम करून उद्या काही घडले तर हात झटकायला मोकळे.

धोकादायक परिसर

‘एस’ विभागातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभिम नगर, गौतमगर आणि भांडुप (पश्चिम)येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना धोक्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात जोरदार पावसामुळे दरडी कोसळणे, डोंगरावरुन पाण्याचा अचानक लोंढा येणे, त्यात झोपड्या वाहून जाणे,जोरदार पावसामुळे नाल्यांना पूर येणे आदी गंभीर स्वरूपाच्या कारणांमुळे जीवित, वित्तीय हानी होण्याची शक्यता लक्षात घेता डोंगर माथ्यावर, पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -