घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाचा धोका ज्येष्ठांनाच; पालिका करणार स्वतंत्र सर्वेक्षण

CoronaVirus: कोरोनाचा धोका ज्येष्ठांनाच; पालिका करणार स्वतंत्र सर्वेक्षण

Subscribe

‘कोरोना कोविड १९’ची बाधा झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित स्वरूपाचे श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थॉयराईड विषयक आजार, अनियंत्रित दमा यासारख्या बाबी आहेत, त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिता आता मुंबईतील कोरोनाचा धोका असलेल्या सर्व ज्येष्ठांचा शोध घेऊन त्यांचा सर्वे करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येणार आहे.

मुंबईत ‘कोरोना कोविड १९’ चा पहिला रुग्ण हा दिनांक ११ मार्च २०२० रोजी आढळून आला. त्यानंतर मंगळवारपर्यंत ३ हजार ४४५ बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी ४०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर  मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या २ हजार ८८२ बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या बाधितांपैकी १५० रूग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे.

- Advertisement -

आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका संभवू शकतो. अशा ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून एक विशेष सर्वेक्षण मुंबई महानगरपालिका हाती घेत आहे. यामध्ये प्रामुख्याने अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, कर्करोग, अनियंत्रित दमा, मूत्रपिंड विकार, थॉयराईड विषयक आजार, श्वसनाचे आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नोंद प्राधान्याने घेतली जाणार असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार केले जाणार आहेत.

प्राधान्याने झोपडपट्टी परिसरात करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणादरम्यान आढळून येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाबाबत काय काळजी घेतली जाईल. याबाबतचे मार्गदर्शन संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळून आल्यास त्यानुसार वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक ते उपचार देखील करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हे सर्वेक्षण आरोग्य केंद्रांमार्फत केले जाणार आहे. प्रत्येक चमुत दोन आरोग्य सेविकांसह आशा वर्कर किंवा एसएसएस या स्वयंसेवकांचाही या समावेश असेल. घरोघरी जावून हा ज्येष्ठांचा सर्वे होणार असून त्यांमध्ये त्यांना असलेल्या आजारांची माहिती प्राप्त करून त्याप्रमाणे उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

मुंबईतील नॉन कोरोना रुग्णालये

उपनगरीय रुग्णालये ही ‘नॉन कोविड’ रुग्णालये म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये सांताक्रूझ पूर्व परिसरातील विष्णुप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वोपचार रुग्णालय, मालाड पूर्व परिसरातील सदाशिव कानोजी पाटील मनपा सर्वोपचार रुग्णालय, बोरिवली पूर्व परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, विक्रोळी परिसरातील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड पूर्व परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रुग्णालय इत्यादी उपनगरीय रुग्णालयांच्या समावेश आहे. या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुमारे ३०० खाटा ‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी आहेत. या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या जेजे समूह रुग्णालयामध्ये १०० खाटा या ‘नॉन कोविड’रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहे. याव्यतिरिक्त खाजगी रुग्णालयातील धर्मादाय खाटांचा उपयोग देखील या रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.


हेही वाचा – Coronavirus: ‘कोरोनानंतर दुसऱ्या एका महाभंयकर संकटाची चाहूल’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -