घरमुंबईमुंबई महापालिकेकडून दिलासा! बोअरवेल खोदण्यास मिळणार ऑनलाईन परवानगी

मुंबई महापालिकेकडून दिलासा! बोअरवेल खोदण्यास मिळणार ऑनलाईन परवानगी

Subscribe

बोअरवेल खोदण्यास ऑनलाईन परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे कळवले आहे.

मुंबईत पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी, नवीन इमारत बांधकामाकरिता पाण्याचा वापर करण्यासाठी ‘बोअरवेल’ खोदण्यास ऑनलाईन परवानगी देण्याची प्रक्रिया मुंबई महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत पालिका जल अभियंता खात्यामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, याच पिण्याच्या पाण्याचा वापर शौचालय, मुतारी, गाड्या, कपडे, लोखंडी खिडक्या, ग्रील, धुणे, उद्यान कामे, भांडी घासणे आदी कामांसाठी केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत आहे. मात्र, जर या पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी ‘बोअरवेल’ खोदून त्यातील पाण्याचा वापर केल्यास पिण्याच्या पाण्याचा वापर कमी होऊन शुद्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार आहे.

‘बोअरवेल’ खोदण्यासाठी संबंधित विविध खात्यांच्या परवानग्या मिळवण्यात व जाचक अटीशर्ती आदींमुळे बराच उशीर होतो. त्यामुळे बोअरवेल खोदून त्यातील पाण्याचा चांगल्या उद्देशाने वापर करण्याबाबतचा हेतू साध्य होत नाही. यास्तव, पालिकेने ‘बोअरवेल’ खोदण्यासाठी आवश्यक असलेली जाचक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून जल अभियंता खात्याने तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक हरीश छेडा यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती.

त्यावर पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. यापुढे बोअरवेल खोदण्यास ऑनलाईन परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे कळवले आहे. वास्तविक मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही भागात भूमिगत करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी दिल्यावर खोदकाम करताना जमिनीखालील भूमिगत जलवाहिनीचे नुकसान होऊ नये यासाठी अधिक काळजी घेण्यात येत असून त्यासाठी वारंवार तपासणी, खातरजमा करण्यात येत असल्याने या कामासाठी काहीसा वेळ लागतो. त्यामुळेच ‘बोअरवेल’ साठी परवानगी देताना काहीसा उशीर होत असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र, ऑनलाईन परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -