मुंबईत दोन लाख दुकानांवर मराठी भाषेत पाट्या; आता उरले फक्त 15 दिवस

मुंबई : शहरातील पाच लाखांहून अधिक दुकानांवर आणि आस्थापनांवर मोठ्या आणि ठळक अक्षरात मराठीत नाव लिहावे असे आदेश मुंबई महापालिकेने काढले आहेत. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. त्यानुसार, आतापर्यंत दोन लाख दुकाने, हॉटेल्स आदींनी मराठी भाषेतून पाट्या लावल्या आहेत.

दुकाने, हॉटेल्स आदीं ठिकाणी कायद्यान्वये मराठी भाषेतून कोण-कोण पाट्या लावत आहेत व कोणी अद्याप लावलेल्या नाहीत, याची पाहाणी मुंबई महापालिकेच्या अधिकारी तसेच पथके प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन करीत आहेत. मुंबई महापालिकेने यापूर्वीही दुकानदार, हॉटेल चालकांना त्यांच्या दुकाने, हॉटेल्सवरील पाट्या मराठी भाषेतून लिहिण्याबाबत अनेकदा संधी व मुदतवाढ दिली आहे.

यंदा मार्च महिन्यात झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकाने, आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, यापूर्वी 2018च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते. मात्र, आता राज्य सरकारने मराठी भाषेतून पाट्या लागल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. यासंदर्भातील नियमांत बदल करून नियम अधिक कडक केला आहे. या नव्या नियमानुसार यापुढे, कर्मचार्‍यांची संख्या कितीही असली तरी दुकान, हॉटेलच्या पाट्या मराठी भाषेत व ठळक अक्षरात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबईतील सर्व आस्थापनांना नामफलकात आवश्यक तो बदल करण्यासाठी पालिकेने याआधी 31 मे 2022पर्यंत मुदत दिली होती. त्यांनतर हा कालावधी पुन्हा आठ – दहा दिवसांसाठी वाढविण्यात आला होता. पण त्यानंतर व्यापारी संघटनांच्या मागणीमुळे पालिकेने दुकाने व आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेमधून लिहिण्याबाबत 30 जून 2022पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र पुन्हा व्यापारी संघटनांनी मुदतवाढ मागितल्याने 30 सप्टेंबर 2022पर्यंत दुकाने व हॉटेल्स यांना मराठी भाषेतून ठळक अक्षरात पाट्या लिहिण्याबाबत मुदत देण्यात आली आहे. पालिकेच्या पाहणीमध्ये पाच लाख दुकांदारांपैकी दोन लाख दुकानदारांनी मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या लिहिल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.