Homeक्राइमBomb Threat To RBI : आरबीआयची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी, रशियन मेलमुळे...

Bomb Threat To RBI : आरबीआयची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी, रशियन मेलमुळे खळबळ

Subscribe

मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. थेट रशियन भाषेत धमकीचा ई-मेल आल्याकारणाने खळबळ उडाली आहे.

मुंबई : गेल्या आठवड्याभरात दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सततच्या मिळणाऱ्या धमक्यांमुळे दिल्ली पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. ही धमकी नेमकी कोण आणि कशाकरिता देत आहे, यामागचे कोणतेही कारण समोर येऊ शकलेले नाही. अशातच आता मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. याआधी सुद्धा अशा प्रकारे धमकी मिळालेल्या आहेत. मात्र, आता थेट रशियन भाषेत हा ई-मेल आल्याकारणाने खळबळ उडाली आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर रशियन भाषेत धमकीचा मेल आला आहे. (Bomb Threat To RBI building Russian mail stirs up excitement)

काही दिवसांपूर्वीच संजय मल्होत्रा यांनी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा पदभार सांभाळला. त्यानंतर लगेच गुरुवारी (ता. 12 डिसेंबर) दुपारी आरबीआयच्या अधिकृत मेल आयडीवर रशियन भाषेतील धमकीचा मेल आला. ही घटना आज शुक्रवारी (ता. 13 डिसेंबर) उघडकीस आली. परंतु, या मेलची तक्रार लगेच माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी तपास सुरू असल्याचे मुंबई पोलीस झोन 1 च्या डीसीपींकडून सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यातही आरबीआयला अशाच प्रकारे धमकी मिळाली होती. परंतु, दिल्लीतील शाळांना वारंवार मिळणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा… Bombay HC : …तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या, फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून न्यायालयाने सरकारला फटकारले

गेल्या काही महिन्यांमध्ये विमानांना किंवा शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच दिल्लीतील किमान 44 शाळांना अशाच प्रकारचे ई-मेल आले होते. तपासाअंती या धमक्यांना केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी म्हटले. तर, दिल्लीतीलच डीपीएस, मॉडर्न स्कूल, केम्ब्रिज स्कूल, सलवान पब्लिक यांचा त्यात समावेश आहे. शुक्रवारी या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर विविध सुरक्षा एजन्सीजनी शाळेच्या परिसरात तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच पोलिसही उपस्थित होते. परंतु, आता आरबीआयला आलेला रशियन भाषेतील नेमका कोणी आणि का केला? याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.


Edited By Poonam Khadtale