घरमुंबईमुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमक्यांचे सत्र सुरूच

मुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमक्यांचे सत्र सुरूच

Subscribe

मुुलुंड आणि सहार पोलिसांकडून २ संशयितांची चौकशी

 शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच असून या धमक्यांमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, या धमक्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिल्यानंतर काही तासांत मुलुंड आणि सहार पोलिसांनी धमकी देणार्‍या २ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल, असे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी १० फेब्रुवारीला मुंबई दौर्‍यावर येत आहेत. यादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एकीकडे पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असताना दुसरीकडे मुंबई शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासांत धमकीचे २ कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यातील एका कॉलरने सकाळी १० वाजता कॉल करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअरपोर्ट कॉन्टॅक सेंटरच्या क्रमांकावर घातपात होणार असल्याची धमकी दिली होती. संबंधित व्यक्तीने त्याचे नाव इरफान अहमद शेख असल्याचे सांगून तो इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेचा सदस्य असल्याचा सांगितले होते. तो अतिरेकी, मुजाहिद्दीन तसेच अन्य काही संशयास्पद फ्रिक्वेसी कोडवर्डमध्ये बोलत होता. या कॉलनंतर तिथे उपस्थित अधिकार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह मुंबई पोलिसांना ही माहिती दिली होती.

- Advertisement -

या माहितीनंतर सहार पोलिसांसह एटीएस, गुन्हे शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. संपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानतळाची तपासणी करण्यात आली, मात्र कुठेही पोलिसांना काहीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर संशयित व्यक्तींची पोलिसांची तपासणी सुरू केली होती, मात्र त्यातही पोलिसांना काही संशयास्पद सापडले नव्हते. या घटनेनंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. हा तपास सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा कॉल करणार्‍या एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा तरुण गोवंडी येथे राहत असून त्यानेच धमकीचा कॉल केल्याची कबुली दिली आहे. दुसरीकडे मुलुंड चेकनाक्यावर २ संशयित व्यक्ती मुंबई शहरात बॉम्बस्फोट होणार आहे अशी चर्चा करत होते. ही माहिती सोमवारी रात्री रात्री दीपक कांबळे याने ठाणे मुख्य नियंत्रण कक्षाला दिली होती.

या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती. त्याचा ठाणे पोलिसांसह मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असतानाच पोलिसांनी दीपक कांबळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानेच मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिल्याने त्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. तपासात दीपक हा सांगलीचा रहिवासी असून दारूच्या नशेत त्याने पोलिसांना ही माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. तो चालक म्हणून काम करतो. पोलिसांना कॉल केल्यानंतर तो चेकनाका परिसरात फिरत होता. यावेळी त्याला मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गेल्या काही दिवसांत धमकीचे निनावी कॉलमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच धावपळ झाली आहे. थट्टामस्करी म्हणून केलेल्या या कॉलमुळे पोलिसांना चांगलेच कामावर लावले जात असल्याने अशा कॉलरविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून संंबंधित पोलिसांना देण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, नरेंद्र मोदी हे मुंबई दौर्‍यावर येत असल्याने मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली असून मुंबई शहरात ड्रोन, पॅराग्यायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्रास्ट, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आदींना बंदी घालण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कुलाबा, अंधेरी परिसरात भेटी देणार आहेत, तिथे जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यासाठी केंद्रीय तपास आणि गुप्तचर यंत्रणेची मदत घेतली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -