धारावीत नाल्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू!

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये एका ७ वर्षांच्या मुलाचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना समोर आली आहे.

Death
प्रातिनिधिक छायाचित्र

गोरेगावमध्ये गटारीत पडलेला दिव्यांश आणि त्यानंतर वरळी सी-लिंक परिसरात कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला असतानाच आता तशाच प्रकारची एक घटना आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या मुंबईच्या धारावीमध्ये घडला आहे. ७ वर्षांच्या अमित मुन्नालाल जयस्वाल या चिमुरड्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला असून अमितला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे आता पावसाळ्याचे ३ महिने काढायचे बाकी असताना शहरातल्या उघड्या गटारांचा, नाल्यांचा आणि त्याशेजारी राहाणाऱ्या लोकांच्या जिवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नक्की काय घडलं धारावीतल्या त्या नाल्यावर?

दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. धारावीतल्या यलो बंगलोजवळ राजीव गांधी कॉलनी एकच्या परिसरामध्ये वाहत असलेल्या नाल्यामध्ये दुपारी तीनच्या सुमारास हा अमित पडला. या प्रकाराबद्दल समजल्यानंतर स्थानिकांनी लागलीच पोलिसांना पाचारण केलं. स्थानिक पोलिसांनी अमितला नाल्यातून बाहेर काढेपर्यंत एक ते दीड तास निघून गेला होता. त्याला पोलिसांनी लागलीच नजीकच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

आठवड्याभरात तिसरा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उघडी गटारं, नाले, मॅनहोल अशा ठिकाणी पडून मुलं अडकण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. गोरेगावमध्ये मॅनहोलमध्ये पडलेल्या दिव्यांशचा शोध एनडीआरएफंन ३ दिवसांनंतर थांबवला. मात्र, दिव्यांशचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच दोनच दिवसांपूर्वी वरळी सी-लिंकजवळ कोस्टल रोडसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून बबलू कुमार नावाच्या एका १२ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. त्यानंतर आता धारावीमध्ये देखील तशाच प्रकारची घटना घडली आहे.