घरनवरात्रौत्सव 2022शहीद वीराची वीरांगणा

शहीद वीराची वीरांगणा

Subscribe

पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची बुरसटलेली प्रथा आपल्या देशात होती. अठराव्या शतकात मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेच्या बाबतीत ही प्रथा मोडली आणि भारतात एक नवा इतिहास घडला. मल्हाररावांची सून अहिल्यादेवी होळकर सती न जाता एक कर्तबगार राजकारणी, प्रजाहित दक्ष प्रशासक झाल्या. पतीच्या निधनानंतर पतीचे कार्य निढळाने पुढे चालवणार्‍या राणी लक्ष्मीबाई, सावित्रीमाई फुले आणि ताराबाई शिंदे असे अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. इतिहासातील या घटनांची जेव्हा वर्तमानात पुनरावृत्ती होते, तेव्हाच इतिहासाचा आदर्श लोकांसमोर ठेवला जातो. हाच आदर्श पुन्हा पुन्हा निर्माण करते लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यासारख्या रणरागिणी...

नोव्हेंबर २०१५ साली कर्नल संतोष महाडिक कुपवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. महाडिक कुंटुंबीयांसहीत संपूर्ण देश हळहळला. संतोष महाडिक यांच्या पश्चात पत्नी स्वाती महाडिक आणि दोन मुलं असा परिवार होता. सरकार, राज्य कुंटुंबाच्या पाठिशी आहे, हा निरोप महाडिक कुंटुंबीयांना पोहोचण्याच्या आतच स्वाती महाडिक यांनी पतीच्या पार्थिवासमोरच संतोष महाडिक यांचे देशसेवेचे व्रत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णय घेतला नाही तर वर्षभरात तो साध्य करून दाखवला. आपण स्वतःच नाही तर आपली मुलंही सैन्यात जाऊन देशसेवा करतील असा ठाम निर्धार स्वाती महाडिक यांनी पतीच्या पार्थिवासमोरच व्यक्त केला होता.

स्वाती महाडिक या पुर्वीपासूनच स्वतंत्र विचारांच्या होत्या. स्वाती यांचे बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं. लग्नाच्या आधी स्वाती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत झोपडपट्टी निर्मूलन विभागात काम करत होत्या. दारिद्र रेषेखालील जनतेसाठी ज्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करायच्या. सैनिकांना मुलगी मिळत नाही, अशी परिस्थिती आज पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आहे. मात्र स्वाती यांनी संतोष महाडिक यांच्यासाठी महानगरपालिकेची नोकरी सोडून दिली आणि त्यांची पोस्टींग जिथे जिथे असेल तिथे त्या गेल्या.

मी स्वतः वसुधैव कुटुंबकम् वर विश्वास ठेवते. तेव्हा फक्त देशापुरता विचार ठेवून चालणार नाही. तर माणुसकी आणि समाजाचा विचारही केला पाहीजे. आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात प्रामाणिक काम केले तर ती ही एकप्रकारची देशसेवाच असते – स्वाती महाडिक

- Advertisement -

स्वाती यांच्या लग्नाची गोष्ट

स्वाती सांगतात मला लग्नाची खूप हौस होती. हम साथ साथ है चित्रपटासारखी एकत्र कुटुंब पद्धती आणि नातेवाईकांत रमणे त्यांना खूप आवडायचं. वडील वनखात्यात नोकरीला होते. त्यांच्यामागे स्वाती यांनी लग्नासाठी तगादा लावला होता. मुलगा शोधण्याच्या प्रक्रियेत त्यांची गाठभेट संतोष महाडिक यांच्याशी झाली. तेव्हा संतोष लग्नासाठी तयार नव्हते. मात्र स्वाती यांनीच त्यांना आठवण करून दिली की आपण एकाच कॉलेजमध्ये होतो. तुम्ही बीएससीच्या शेवटच्या वर्षाला असताना मी पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे संतोष यांना स्वाती तेव्हा आवडायच्या. स्वाती यांनी एका संस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला होता की मी त्यांची क्रश होते. त्यामुळेच लग्नासाठी तयार नसलेले संतोष माझ्याशी लग्नाला तयार झाले आणि आमचे अरेन्ज मॅरेज झाले.

sawati and santosh mahadik
स्वाती महाडिक आणि शहीद संतोष महाडिक आणि परिवार

स्वाती यांचे समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेले होते. त्यामुळे लग्नानंतर या क्षेत्राशी निगडीत कार्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बंगळुरुमध्ये पोस्टिंग असताना स्वाती यांनी स्पेशल एज्युकेशनचा डिप्लोमा केला. या कोर्सनंतर त्यांनी विशेष दिव्यांग मुलांना शिक्षण देण्याचे काम केले. आपल्या कामाप्रती समर्पण काय असते? याचे उदाहरण स्वाती यांनी कामातून दाखवून दिले होते. ज्या शाळेत त्या शिक्षण देत होत्या, तिथे येण्याजाण्यासाठी त्यांना दिडशे रुपये खर्च होत होते आणि मानधनाच्या रुपात मिळत होते फक्त शंभर रुपये.

- Advertisement -

आपल्या त्याग आणि समर्पण वृत्तीबद्दल स्वाती सांगतात, की मी माझ्या डेस्टिनेशनचा कधीच विचार केला नाही. मी माझ्या प्रवासाचा आनंद घेत राहिले. त्यामुळे नकारात्मकता माझ्या मनाला शिवत नाही.

आणि तो कठीण निर्णय घेतला

साडी घालायची, रुढी परंपरा निभावायच्या, संसार करायचा अगदी एका सामान्य मुलींना ज्या अपेक्षा असतात, त्याच अपेक्षा स्वाती यांच्याही होत्या. मग तरिही त्यांनी संतोष महाडीक शहीद झाल्यानंतर सैन्यात जाण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न राहतो. स्वाती सांगतात संतोष यांचे निधन झाल्यानंतर पहिले दहा दिवस खूप कठीण गेले. मुलांना धीर देता येत नव्हता. खूप खचले होते. यातून सावरायचे कसे याचा विचार सुरू होता, आणि त्यातूनच हा विचार पुढे आला. ज्याबद्दल आपल्या मनात भीती आहे त्याच्या विरोधात असलेली गोष्ट करायची. लोकांची सहानुभूती, भय याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे स्वाती सांगतात.

Sawati Mahadik becomes lieutenant
स्वाती महाडिक यांचा दिक्षांत समारंभ

दहशतवाद संपवण्याचा संतोष महाडिक यांचा फॉर्म्युला

अतिरेक्यांशी लढताना कर्नल संतोष महाडीक यांना वीरमरण आले असले तरी दहशतवादाविषयी त्यांचे मत वेगळे होते. जसे एखादे गणित सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तसे दहशतवाद संपवण्याचेही अनेक पर्याय आहेत, असे त्यांचे मत होते. दहशतवादी निर्माण होऊच नये, या पर्यायावर त्यांचा जास्त विश्वास होता. यासाठी कुपवाडा येथे सद्भावना कॅम्प ते घेत होते. याबरोबरच संतोष यांनी कुपवाडा पर्यटन केंद्र सुरू केले होते. श्रीनगरचे पर्यटक कुपवाड्यात यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. तसेच कुपवाड्यातील शाळेतील मुलांना पर्यटक आणि बाहेरच्या राज्यातील लोकांच्या गाठभेटी करून दिल्या. या संवादातून तिथल्या मुलांना बाहेरचे जग कळू लागले होते.

स्त्री असल्याचा अभिमान

स्वाती महाडिक यांनी दोन मुलं असतानाही सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक स्त्री म्हणून अडचण आली का? असा प्रश्न विचारल्यावर स्वाती म्हणतात की, मला स्त्री असण्याचा अभिमान आहे. त्यामुळे या निर्णयात माझे स्त्रीत्व कधीच आड आले नाही. परीक्षा दिल्यानंतर ट्रेनिंग दरम्यान स्त्री-पुरुष असा कधीच भेद केला नाही. सीमेवर शत्रूसमोर बंदुकीचा चाप ओढताना बंदुक चाप ओढणारं बोट स्त्रीचे की पुरूषाचे हा प्रश्न विचारत नाही. तिथे फक्त बंदुकीचा चाफ ओढण्याची त्या बोटात शक्ती असावी लागते.

हॅलो आणि समोरून त्या जय हिंद म्हणाल्या

जागर आईचा या सदरसाठी स्वाती यांची मुलाखत घेण्याचे ठरल्यानंतर त्यांना फोन केला. इकडून हॅलो म्हटल्यानंतर पलीकडून आवाज आला.. जय हिंद आणि आपण कुणाशी बोलतोय याची झटकन प्रचिती आली.

लेफ्टनंट म्हणून काम करताना आता काय वाटतंय असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, खुप छान अनुभव आहे. नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी ठरवलं होतं की मला फक्त काम शिकायचं आहे. आज ज्या पद्धतीने मी काम करतेय, त्यावरून मी घेतलेला निर्णय योग्य होता असं आता वाटतंय. कुठलंही काम करताना त्या कामात आपल्याला इंट्रेस्ट घेतला पाहीजे. पैसा, फेम मिळेल म्हणून एखाद्या क्षेत्रात जात असाल तर मग कदाचित अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्याला आवडत्या क्षेत्रातच काम करा.

#MeToo वर शिक्षण हाच पर्याय

सध्या देशभरात मीटूचे वादळ घोंगावतेय. याबद्दल स्वाती यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, शिक्षण हेच सर्व गोष्टीवर योग्य उत्तर आहे. शिक्षणातूनच विचार प्रक्रिया चांगली होते आणि चांगल्या विचारातूनच चांगला समाज घडत असतो. त्या समाजात अशा घटना घडणार नाहीत.

मुलींनी सैन्यात येण्यासाठी काय करावं

एसएसबीची परीक्षा देणं हे सोपं काम नाही. त्यासाठी मुलांची लहानपणापासून तयारी करायला हवी. या कामासाठी सकारात्मकता असावी लागते ती एका दिवसात येत नाही. यासाठी लहानपणापासून प्रयत्न करायला हवेत. एसएसबीसाठी सायकॉलॉजी सोबत तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्याचे चौफेर ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे आरोग्याची काळजी घ्या. निरोगी शरीर असेल तरच सैन्यात आपण देशसेवा करू शकतो.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -