घरमुंबईब्रिमस्टोवॅड प्रकल्पावर अडीच हजार कोटीं खर्चूनही ३५ टक्के कामे प्रलंबितच

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पावर अडीच हजार कोटीं खर्चूनही ३५ टक्के कामे प्रलंबितच

Subscribe

२६ जुलै २००५ च्या पूरस्थितीनंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातील कामांना सुरुवात १५ वर्षे उलटली तरी कामे अपूर्णच पूरस्थिती रोखण्यात १०० टक्के यश नाही १५ कामे प्रगतीपथावर, ३ कामांची प्रक्रिया निविदा स्तरावर आठपैकी सहा पंपिंग स्टेशन कार्यान्वित; माहुल, मोगरा पंपिंगचे काम प्रलंबितच

२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकरांच्या चांगलाच स्मरणात असेल. कारण, याच दिवशी मुंबईत एकाच दिवशी तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडला. त्याचवेळी समुद्रात मोठी भरती येऊन साडेचार मिटर उंचीच्या लाटा उसळल्या. मोठे नाले तुंबले आणि मिठी नदीसह अन्य नद्यांना मोठा पूर आला व मुंबईची तुंबई होऊन मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली होती. तेव्हापासून मुंबई महापालिकेने पुरस्थिती रोखण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेण्यात आला.

या प्रकल्पाच्या अंतर्गत नदी, नाले यांच्या खोलीकरण, रुंदीकरणाची कामे, पंपिंग स्टेशनची कामे हाती घेण्यात आली. मात्र आज १५ वर्षे उलटली आणि ब्रिमस्टोवॅड प्रकल्पावर अडीच हजार कोटी रुपये खर्चूनही ५८ पैकी ४० कामे पूर्ण झाली आहेत तर १८ कामे बाकी आहेत. त्यामुळे ब्रिमस्टोवॅड अंतर्गत सर्व कामे पूर्ण होणार कधी, आणखीन किती कालावधी, वर्षे लागणार आहेत, मुंबई पुरमुक्त होणार तरी कधी? असे प्रश्न मुंबईकरांना पडले आहेत.

- Advertisement -

ब्रिमस्टोवॅड अंतर्गत कामे आजही प्रलंबित राहिल्याने सध्या मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, सदस्य भालचंद्र शिरसाट आदींनी पालिका प्रशासनाला स्थायी समितीच्या बैठकीत चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला होता. तसेच, या ब्रिमस्टोवॅड अंतर्गत कामांची सद्याची स्थिती काय, आतापर्यंत या प्रकल्पाअंतर्गत किती कामे पूर्ण झाली, किती कामे प्रलंबित आहेत, त्यांची कारणे काय आहेत, त्यावर किती कोटींचा निधी खर्च झाला, अशी प्रश्नांची सरबत्ती करून प्रशासनला भंडावून सोडले आहे.

त्यामुळे पालिकेला या प्रकल्पाबाबतची सत्य माहिती देताना नाकीनऊ आल्यासारखी गत झाली आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि उदासीनतेमुळे ब्रिमस्टोवॅडची कामे आजही अपूर्णच राहिली आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी आणखीन किती कालावधी लागेल याबाबत पालिका प्रशासनाला शाश्वत माहिती देणे जड जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

५८ पैकी ४० कामे पूर्ण १८ कामे प्रलंबित

मुंबईत ब्रिमस्टोवॅड अंतर्गत टप्पा १ अंतर्गत एकूण २० कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी १८ कामे पूर्ण झाली. २ कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच, टप्पा २ अंतर्गत ३८ कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी २२ कामे पूर्ण झाली असून १३ कामे प्रगतीपथावर आहेत. तर ३ कामांच्या निविदा प्रक्रिया या नियोजन स्तरावर आहेत. एकूण ५८ कामांपैकी ४० कामे पूर्ण झाली आहेत तर १८ कामे प्रलंबित आहेत.

आठ पैकी सहा पंपिंग स्टेशन कार्यान्वित

मुंबई महापालिकेने महत्वाच्या सखल भागात साचणारे पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी आठ ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी हाजी अली आणि इर्ला पंपिंगचे काम ३१ मे २०११ रोजी पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्यात आले. तसेच, क्लिव्ह लॅन्ड आणि लव्हग्रोव्ह या दोन पंपिंगचे काम ३१ मे २०१५ रोजी पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले. त्यानंतर ब्रिटार्निया आणि गझधरबंध पंपिंगचे काम ३१ मे २०१६ रोजी पूर्ण झाले आणि ते कार्यान्वित करण्यात आले. मात्र आजही माहुल व मोगरा या पंपिंग स्टेशनची कामे अद्यापही सुरू होऊ शकलेली नाहीत.त्यातही माहुल पंपिंगसाठी जागा उपलब्ध होण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्याने त्यासाठी आणखीन काही अवधी लागणार आहे. तर मोगरा पंपिंगबाबतची प्रक्रिया ही निविदा स्तरावर प्रलंबित आहे.

तसेच, आजही मिठी नदी व अन्य नद्यांच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या ब्रिमस्टोवॅड अंतर्गत कामे १००% पूर्ण झालेली नाहीत. जोपर्यंत मुंबईतील ही सर्व कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबईकरांना पूरस्थितीपासून १००% दिलासा मिळणे कठीणच आहे.

आजही ३८६ ठिकाणी पाणी साचते

मुंबई शहराची भौगोलिक रचना ही बशीसारखी आहे. त्यामुळे मुंबईत ताशी सरासरी ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास अतिवृष्टी झाल्यास मुंबईतील सखल भागात हमखास पाणी साचते. आजही ब्रिमस्टोवॅड अंतर्गत अडीच हजार कोटी रुपये खर्च करूनही ३८६ ठिकाणी पाणी साचते. पालिकेने गतवर्षी या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ४१२ ठिकाणी छोटया क्षमतेचे पंप बसवले होते. यंदा या ठिकाणी ४०० पंप बसविण्यात येणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -