घरनवरात्रौत्सव 2022शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणारी रणरागिणी

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणारी रणरागिणी

Subscribe

105 पेक्षा अधिक मुलांच्या शिक्षणाचा मार्ग केला सुकर

सिग्नल, रस्त्यावर फिरणारी, चहाच्या टपरीवर काम करणारी, लोकलमध्ये साहित्य विकणारी मुले शाळेत जात असतील का? असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांनी शिकावे असेही आपल्याला वाटते. परंतु, धावपळीच्या जगात या मुलांच्या शिक्षणासाठी आपण पुढाकार घेण्यास धजावत नाही. परंतु, चेंबूरच्या जवाहर विद्या भवन शाळेतील शिक्षिका व राज्य सरकारच्या शाळाबाह्य मुक्त परिसर मोहिमेतील बालरक्षक स्वराली लिंबकर यांनी शाळा सुटलेल्या व कधीच शाळेत न गेलेल्या अशा तब्बल 105 पेक्षा अधिक मुलांच्या हातात पाठी दिली आहे. इतकेच नव्हे,तर ही मुले नियमित शाळेत जात आहेत की नाहीत, याच्यावरही त्या जातीने लक्ष देतात.

शिक्षक हक्क कायद्यानुसार समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वेठबिगार कामे करणारी मुले, भीक मागणारी मुले यांनाही शिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी त्यांनी ‘बालरक्षक’ नेमण्याचा निर्णय घेतला. बालरक्षक होण्यासाठी शिक्षकांनी स्वेच्छेने पुढे येण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले. त्यानुसार मुंबईतून तीन बालरक्षक पुढे आले. त्यामध्ये स्वराली लिंबकर या एक आहेत. लिंबकर शिक्षिका असल्या तरी त्यांना समाजसेवेची आवड होती. आपल्या मुलांप्रमाणे रस्त्यावरील मुलांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटे. त्यामुळे त्यांनी बालरक्षक होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

माहुलमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या मुलांच्या शाळा जुन्याच ठिकाणी असल्याने व जवळपास शाळा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या. लिंबकर यांनी या मुलांना पुन्हा शाळेत आणण्याचे कार्य सुरू केले. झोपडपट्टी व रस्त्यावर राहणार्‍या मुलांचे पालक लिंबकर यांच्याशी वाद घालत असत. मुले कमावती असल्याने त्यांना शाळेत पाठवण्यास विरोध होवू लागला. परंतु, लिंबकर यांनी त्यांच्याशी संवाद साधून समस्या जाणून वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवत मुलांना शाळेत आणण्यात यश मिळवले. शाळाबाह्य मुलांना अनेक खासगी शाळा प्रवेश देण्यास नकार देतात. पण लिंबकर यांनी सरकारी नियमांचा आधार घेत मुख्याध्यापकांशी चर्चा करून मुलांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर केला.

मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शालेय शुल्क भरण्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थाची मदत घेतली. तसेच काही मुलांना राज्य मुक्त विद्यालय मंडळात प्रवेश दिला. त्यामुळे काम व शिक्षण अशा दोन्ही जबाबदार्‍या त्यांना पार पडणे शक्य झाल्याचे बालरक्षक स्वराली लिंबकर यांनी सांगितले.

- Advertisement -

मोहीम व्यापक करण्यासाठी प्रयत्न

‘शाळाबाह्य मुक्त परिसर’ ही मोहीम अधिक व्यापक व्हावी यासाठी लिंबकर या नेहमी विविध प्रयोग करत असतात. शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी त्या प्रोत्साहित करत आहेत. यातून अनेक पालक व विद्यार्थी शाळाबाह्य मुलांची माहिती लिंबकर यांना येऊन सांगत आहेत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झोपडपट्ट्यांमध्ये जात असतात, त्यांच्या माध्यमातूनही त्यांनी शाळाबाह्य मुले शोधण्याचे कार्य सुरू केले असल्याचे लिंबकर यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -