घरमुंबई‘बीएसयूपी’तील 2 हजार घरे ऑगस्टमध्ये मिळणार

‘बीएसयूपी’तील 2 हजार घरे ऑगस्टमध्ये मिळणार

Subscribe

ठाणेकरांना खुशखबर ,आयुक्तांची घोषणा

ठाणे महापालिका हद्दीत राबविण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यातील क्लस्टर योजनेच्या काही भागाचा विकासाचा नारळ येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढविण्यात येईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत दिली. तसेच बीएसयुपी योजनेतील 2 हजार घरे येत्या महिनाभरात नागरिकांना उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तर क्लस्टरच्या आड येणार्‍या अनेक त्रुटी दूर करण्यात आल्या असल्या तरी या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत शेवटपर्यंत अनेक त्रुटी उद्भवणार आहेत. त्यामुळे ही योजना राबविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या या योजनेची पायाभरणी विधानसभा निवडणुकीपूर्वी करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. महापालिका हद्दीत 52 टक्के नागरिक झोपडपट्टी तसेच चाळींमध्ये राहतात. तसेच शहरामध्ये बेकायदा इमारतींची संख्या मोठी असून त्यापैकी अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर क्लस्टर योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र अंमलबजावणीत काही त्रुटी पुढे आल्या. तसेच ग्रामस्थांनी गावठाण भाग क्लस्टरमधून वगळण्याची मागणी केली होती. पहिल्या टप्यातील क्लस्टर राबविण्याची मोहीम अंतिम टप्यात आली आहे. तसेच त्रुटी दूर करण्यात आल्या असून प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर निर्माण होणार्‍या त्रुटी वेळोवेळी दूर केल्या जातील असे आयुक्तांनी स्पष्ट केले. ही योजना राबविताना नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरीत करावे लागणार असून त्यासाठी राज्याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच येत्या सोमवारी क्लस्टरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक आयोजित केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ही योजना राबवित असतानाच शहरात मागील कित्येक वर्षापासून बीएसयुपीच्या घरांची कामे रखडलेली आहेत. मात्र ही कामेसुद्धा आता पूर्णत्वास आली असून येत्या महिनाभरात 2 हजार घरांच्या चाव्या वापट केल्या जाणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. या योजनेतील लाभार्थी सध्या भाडे तत्वावरील योजनेच्या घरांमध्ये राहत असून त्यांना ही घरे दिल्यानंतर भाडे तत्वावरील घरे रिकामी होणार आहेत. त्याठिकाणी अन्य नागरिकांचे पुनर्वसन करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -