आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प मुंबईतील नागरिकांवर घोर अन्याय – लोढा

अजूनही वेळ गेलेली नसून सरकारने मुंबईचा पूर्ण विचार करून मुंबईसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी लोढा यांनी केली आहे.

mangal prabhat lodha

महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प मुंबईकरांवर घोर अन्याय करणारा असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंतचा मुंबईकरांवर अन्याय करणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांची शेरोशायरी

मुंबईच्या विकासाच्या ज्या घोषणा केल्या गेल्या होत्या त्यासाठी या सरकारने अर्थसंकल्पात काहीही आर्थिक तरतूद करण्यात आली नसल्याचे दिसते असे लोढा यांनी म्हटले आहे. आघाडी सरकारने मुंबईवर केलेल्या या अन्यायाबद्दल लोढा यांनी सरकारची निर्भत्सना केली आहे. लोढा पुढे म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच पूर्ण देशाच्या व्यावसायिक कारभाराचे देशातील सर्वात मोठे केंद्र आहे. तरीही आघाडी सरकारने मुंबईवर हा अन्याय केला आहे. लोढा यांनी सरकारला इशारा दिला आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने मुंबईचा पूर्ण विचार करून मुंबईसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणीदेखील लोढा यांनी केली आहे. लोढा म्हणाले की मुंबईतील रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत त्यातच आघाडी सरकारच्या या असल्या कारभारामुळे विकासाच्या बाबतही हे शहर देशातील इतर शहरांपेक्षा मागे पडत जाईल अशी भीती आहे. आशा परिस्थितीत आघाडी सरकारने मुंबईसाठी अर्थसंकल्पात तरतूद न करून मुंबईकरांचा अपमान केला आहे.