समय चौहान हत्या प्रकरण: सुभाषसिंग ठाकूरवर मोक्का

3 आरोपी अद्याप फरार, दैनिक आपलं महानगरचे वृत्त ठरले खरे

विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान हत्येप्रकरणी पोलिसांनी गँगस्टर सुभाषसिंग ठाकूरसह अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुभाषसिंग ठाकूरसह मारेकर्‍यांवर मोक्का लागणार असल्याचे वृत्त दैनिक आपलं महानगरने १८ एप्रिल 2022च्या अंकात दिले होते. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने शिक्कामोर्तब झाले आहे.

२६ फेब्रुवारीला सकाळच्या वेळेस विरार पूर्वेकडील डी मार्टजवळ मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या मारेकर्‍यांनी समय चौहानची गोळ्या घालून हत्या केली होती. विरारच्या सहकार नगरमधील भूखंडाच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उजेडात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली असून अद्याप 3 आरोपी फरार आहेत, तर सुपारी घेतलेला मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे.

विरारमधीलच चाळमाफिया राहुल दुबे हा सध्या गँगस्टर सुभाषसिंग ठाकूरसाठी काम करीत असून त्यानेच सुभाषसिंग ठाकूरच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या एका पथकाने सुभाषसिंग ठाकूर उपचाराच्या नावाखाली दाखल असलेल्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तब्बल 12 दिवस तपासणी केल्यानंतर समय चौहानच्या खुनाचा उलगडा होऊन मारेकरी आणि सुपारी देणारे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

ठाकूर टोळीला मोठा हादरा
समय चौहान हत्याकांडात सुभाषसिंग ठाकूरचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला होता. आता मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने ठाकूर टोळीला मोठा हादरा बसला आहे. ठाकूरची टोळी गेल्या अनेक वर्षांपासून वसई-विरारसह मीरा-भाईंदर शहरात सक्रिय असून जमिनीच्या वादविवादासह बिल्डरांच्या वादातही ही टोळी धमक्या देऊन खंडणी उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच ठाकूर टोळीने या परिसरात काही हत्याही घडवून आणल्याचा संशय असून मोक्का कारवाईनंतर सुभाषसिंग ठाकूरला ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकरणांवर प्रकाश पडण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने व्यक्त केली आहे.