आईचा निरोप घेतला आणि डोळ्यासमोर इमारत कोसळली

मुंबईच्या डोंगरी परिसरात मंगळवारी कोसळलेल्या इमारतीत आतापर्यंत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एका महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

building collapse in donagri of Mumbai
मुंबई : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

मुंबईच्या डोंगरी परिसरात मंगळवारी कोसळलेल्या इमारतीत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अजूनही १० जणांवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत अनेकांनी आपले जीव गमावले तर कोणाच्या पायाला, हाताला तर डोक्याला जबर मार बसला आहे.

अचानक कोसळली इमारत

नेहमीप्रमाणे डोंगरी परिसरातील रहिवाशांचा दिवस सुरू झाला. पण, मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला. कारण, या डोंगरी परिसरातील केसरबाई ही इमारत सकाळी ११.३० च्या दरम्यान अचानक कोसळली. दोन मिनिटांतच उभी असलेली इमारत जमीनदोस्त झाली. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५८ वर्षीय साजिया जरीवाला या गेल्या अनेक वर्षांपासून राहत होत्या.


Viral Check: डोंगरी इमारत दुर्घटनेचा व्हायरल होणारा तो व्हिडिओ फेक


आईचा निरोप घेतला आणि…

साजिया यांची मुलगी हुमा जरीवाला ही नेहमीप्रमाणे आपल्या आईचा निरोप घेऊन घराबाहेर पडली. पण, मागे वळून तिने जेव्हा आपल्या आईला पुन्हा बघण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत इमारत खाली कोसळली होती. तिला काही कळलंच नाही. तिने आपल्या आईला बाहेर काढता यावं यासाठी अनेक प्रयत्न केले. पण, तिची आई तब्बल ७ तासांनी ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर आली. ही परिस्थिती सांगताना हुमाचे डोळे आपल्या आईच्या काळजीने भरुन आले होते. या घटनेत साजिदा यांना बराच मार लागला आहे. त्यांच्या डाव्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मी कामावर जायला निघाले होते. आईला सांगितलं आणि घराबाहेर पडले. आई कामं करुन झोपली होती. इमारतीच्या बाहेर आले आणि मागे वळून आईला बघणार तेवढ्यात इमारत डोळ्यादेखत कोसळली. तिच्या पाठीवर लाद्या पडल्या. त्यामुळे बऱ्याच जखमा देखील झाल्या आहेत. शिवाय, डाव्या हाताची शस्त्रक्रिया केली आहे. आईची आता प्रकृती स्थिर आहे. पण, मला खूप काळजी वाटते.  – हुमा झरीवाला, साजिदा यांची मुलगी

तर, माझ्या बहिणीला तब्बल सात तासांनी ढिगाऱ्याखालून काढलं याची खंत साजिया यांचे भाऊ लिकायत यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेत आणखी कोणी ढिगाऱ्याखाली अडकलं आहे का? पाहण्यासाठी मंगळवारी सकाळी ११.५० नंतर सुरू झालेलं शोधकार्य बुधवारी दुपारपर्यंत सुरू होतं. बुधवारी सकाळी ५ वाजता दोन मृतदेहांना आणि एका जीवंत महिलेला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात जवानांना यश आलं आहे.


हेही वाचा – कोसळलेली इमारत म्हाडाची नव्हतीच! ट्रस्टदेखील तोंड फिरवणार?