घरमुंबईविधान परिषदेचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मतांवर चमत्कार घडणार

विधान परिषदेचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मतांवर चमत्कार घडणार

Subscribe

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला जेमतेम ४८ तास शिल्लक असताना शनिवारी दिवसभर राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत होत्या. बहुजन विकास आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पक्षाची सात मते आणि अपक्षांची मते आपल्याकडे वळवण्याच्या चमत्कारावर विधान परिषदेच्या निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

उद्या, सोमवारी विधान परिषदेसाठी निवडणूक होत आहे. परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकही मत फुटू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी काळजी घेतली आहे. भाजपचे आमदार ताज प्रेसिडन्सी, काँग्रेसचे आमदार वरळीच्या फोर सिझन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडंट आणि शिवसेना आमदार वेस्टिन हाँटेलमध्ये मुक्कामाला आहेत. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने चुरस प्रचंड वाढली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाने तर या निवडणुकीतील चुरस अधिकच वाढवली आहे. या निवडणुकीत चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सर्व दिसेलच. ११ उमेदवारांपैकी एक उमेदवार पराभूत होईल. त्यामुळे चमत्कार तर घडणार आहेच. आता चमत्कार कोणाबाबत घडतोय ते सोमवारी महाराष्ट्र बघेलच. सर्व जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्न करीत आहे. सर्व जागा निवडणून आणण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. २६चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल, असे अजित पवार म्हणाले.

शरद पवार- भाई जगताप भेट

- Advertisement -

दरम्यान,काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

२६ची मॅजिक फिगर गाठण्याची कसरत

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अतिरिक्त मते होती. विधान परिषद निवडणूकीत कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते शिल्लक राहात नाहीत. त्यामुळे पहिल्या आणि दुस-या पसंतीची मते सर्वच राजकीय पक्षांना आपापल्या उमेदवारांना द्यावी लागतील. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २६ मतांची आवश्यक्ता भासेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष २६ मतांचे गणित जुळवण्याच्या कामाला लागले आहेत.

शरद पवार आणि वळसे पाटील भेट

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील. असा विश्वास त्यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंचा संवाद

शिवसेना आमदार पवईच्या वेस्टिन हाँटेलमध्ये मुक्कामाला आहेत. शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या हाँटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यांनी शिवसेना आमदारांशी भेट घेऊन संवाद सांधला. त्यानंतर गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आमदार आणि शिवसेनेला समर्थन देणा-या आमदारांची बैठक झाली. मतदान करताना कोणती खबरदारी घ्यायची याचे मार्गदर्शन बैठकीत करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.

पाचव्या जागेसाठी भाजपची कसोटी

आमदार आणि अपक्षांचे संख्याबळ लक्षात घेतले तर पाचवा उमेदवार निवडून आणताना भाजपची कसोटी लागणार आहे. तर काँग्रेसला दुस-या जागेवरचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेना आमदार आणि अपक्ष मिळून शिवसेनेकडे ६२ मते आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि अपक्षाची चार मते मिळून राष्ट्रवादीची स्वतःची ५५ मते आहेत. काँग्रेसची स्वतःची ४४ मते आहे. त्यांच्याकडे अपक्ष आमदार नाहीत. दोन जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त मतांची गरज आहे. तर भाजपला पाचवी जागा निवडून आणण्यासाठी १३० मते आवश्यक आहेत.

सात मते गुलदस्त्यात

एमआमएमचे दोन, बहुजन विकास आघाडीचे तीन आणि समाजवादी पक्षाचे दोन अशी सात मते कोणाच्या पारड्यात मते टाकणार यावर विधान परिषद निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तूर्तास या पक्षांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -