पर्यटन, कौशल्य विकास विभागात एक लाख रोजगार निर्मिती – मंगलप्रभात लोढा

कॅनडामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण भारतात देण्यासाठी त्या प्रकारे सहकार्य करण्यात येईल. या माध्यमातून पाच हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मीती होण्यास मदत होईल. शंभरपेक्षा अधिक अंगणवाड्या दत्तक घेण्याचा मानस इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचा आहे.

mangal prabhat lodha

मुंबईः महिला व बालविकास क्षेत्रातील अंगणवाड्या व बालसुधारगृह यांचे बळकटीकरण,पर्यटनाला चालना देणे आणि कौशल्य विकास क्षेत्राला गती देण्यासाठी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याशी राज्य शासनाने शुक्रवारी सामंजस्य करार केला. या कराराच्या माध्यमातून पर्यटन आणि कौशल्य विकास विभागात एक लाख रोजगार निर्माण होतील तर महिला व बालविकास विभागाच्या विकासाला चालना मिळेल, असे मत पर्यटन,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

भारतीय वंशाचे कॅनडा स्थित असलेले इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद भारव्दाज यांच्या शिष्टमंडळासोबत सामंजस्य करारावर शुक्रवारी स्वाक्षरी करण्यात आली. या कराराची माहिती देताना मंत्री लोढा म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाव आहे. सागरी गड किल्ले येथील पर्यटन वाढ करण्यासाठी इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्स सहकार्य करणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. पर्यटन क्षेत्रात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट आहे.

महिला धोरण, कॅराव्हॅन धोरण शासन आणत आहे. कौशल्य विकास विभागाअंतर्गत कॅनडामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण भारतात देण्यासाठी त्या प्रकारे सहकार्य करण्यात येईल. या माध्यमातून पाच हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मीती होण्यास मदत होईल. शंभरपेक्षा अधिक अंगणवाड्या दत्तक घेण्याचा मानस इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचा आहे. अंगणवाड्यांचा विकास होण्यास मदत होईल असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

राज्याच्या विकासासाठी सहकार्य करणार : अरविंद भारव्दाज

इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद भारव्दाज म्हणाले, महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी आमच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. वॉटरस्पोर्टस, सागरी गड किल्ले या पर्यटनात नक्कीच प्राधान्याने काम करण्यात येईल. कौशल्य विकास आणि महिला व बालविकास क्षेत्रातही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करण्यात येईल.