घरमुंबईकोल्डमिक्स तंत्रज्ञान रद्द करण्याची मागणी

कोल्डमिक्स तंत्रज्ञान रद्द करण्याची मागणी

Subscribe

मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान अपयशी ठरले आहे. यामुळे हे तंत्रज्ञान रद्द करून नव्या तंत्रज्ञानाने खड्डे बुजवावेत अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला स्थायी समितीत केली.

मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान अपयशी ठरले आहे. यामुळे हे तंत्रज्ञान रद्द करून नव्या तंत्रज्ञानाने खड्डे बुजवावेत अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला स्थायी समितीत केली. यावेळी खड्डे बुजवणार्‍या कंत्रादारांकडून दंड वसूल करून कारवाई करण्यापेक्षा त्यांना काळ्या यादीत टाकून मुंबई खड्डे मुक्त करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.

शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेने कोल्डमिक्स या तंत्रज्ञानाने बुजवले. मात्र, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे दिसत असल्याने नगरसेवकांनी सभागृहानंतर बुधवारी स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरल्याचे स्थायी समितीच्या निदर्शनास आणले.
शहरात ३०० खड्डे असल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असून शहरात ८५०० खड्डे असल्याचा दावा रवी राजा यांनी केला. काळ्या यादीतील कंत्राटदारांकडून अस्फाल्ट घेतले जात असल्याने खड्डे बुजवणार्‍या कंत्राटदारांची चौकशी करण्याची मागणी आसिफ झकेरिया यांनी केली. एकच खड्डा तीन चार वेळा भरून ऑडिट स्कॅम केला जात असल्याचा आरोप झकेरिया यांनी केला. कोल्डमिक्सचा प्लान्ट बाष्पामुळे बंद पडत असेल तर पालिकेचे अधिकारी काय करतात, असा प्रश्न संजय घाडी यांनी केला. आयएएस अधिकारी मुंबईची प्रयोगशाळा करत असल्याने आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त नेमण्यासाठी सल्लागार नेमण्याची मागणी राखी जाधव यांनी केली.

- Advertisement -

कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरल्याने त्वरित हॉटमिक्सचा प्लान्ट सुरू करून खड्डे बुजवा असे आवाहन रईस शेख यांनी केले. प्रशासन व्हीआयपी रस्त्यांसाठी हॉटमिक्स तंत्रज्ञान वापरत असल्याने शहरातील इतर रस्तेही हॉटमिक्स तंत्रज्ञानाने बुजवावेत, अशी मागणी कोटक यांनी केली. कोल्डमिक्सचा प्रस्ताव आणणार्‍या अधिकार्‍यावर करावी करण्याची मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. यावेळी प्रशासनाकडून वॉर्डमध्ये पाठवले जाणारे कोल्डमिक्स जाते कुठे असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यामुळे प्रशासनानेच कोल्डमिक्सचे कंत्राट रद्द करण्यासाठी प्रस्ताव आणावा, अशा सूचना प्रशासनाला केल्या. स्थायी समिती सदस्य तंत्रज्ञान रद्द करण्याची मागणी करत असताना अध्यक्षांनी मवाळ भूमिका घेतल्याने तंत्रज्ञान रद्द करता आला नाही, अशी चर्चा नगरसेवकांमध्ये होती.

कंत्राटदार नाहीत ! प्रशासनाची कबुली 

खड्डे बुजवण्यासाठी अद्याप ३०० टन कोल्डमिक्स वापरण्यात आले आहे. पालिकेच्या झोन ६ साठी कंत्राटदार नाही. झोन ३ साठी कंत्राटदार आला, मात्र त्याचे काम इतर ठिकाणी खराब असल्याने त्याला कंत्राट देण्यात आलेले नाही. या दोन्ही विभागांत कंत्राटदार नसल्याने तात्पुरता दिलासा म्हणून पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवले जात आहेत. आठवड्याच्या शेवटी पाऊस पडल्याने खड्डे बुजवण्यात अडथळे आले. सध्या ३३० ते ३४० मेट्रीक टन कोल्डमिक्स असून त्याचा वापर करून खड्डे बुजवले जातील. कंत्राटदाराने काम न केल्यास पाठीशी घालणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.

- Advertisement -

महानगरची नगरसेवकांमध्ये चर्चा 

कोल्डमिक्स तंत्रज्ञान अपयशी ठरले आहे. पावसाळ्यात कोल्डमिक्सचा प्लान्ट बंद ठेवावा लागत आहे. यामुळे मिश्रण बनू शकले नसल्याने कोल्डमिक्सचे उत्पादन झाले नसल्याचा प्रकार “आपलं महानगर”ने उघडकीस आणला होता. त्याची चर्चा नगरसेवकांकडून केली जात होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -