घरठाणेठाण्यात लवकरच कर्करोग रुग्णालय

ठाण्यात लवकरच कर्करोग रुग्णालय

Subscribe

रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी, रुग्णालयासाठी नाममात्र दराने भूखंड देण्यास नगरविकास विभागाची मान्यता

ठाणे आणि परिसरातील नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार तसेच किफायतशीर उपचार मिळावेत यासाठी ठाण्यात सुसज्ज असे कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्करोग रुग्णालयासाठी नाममात्र दराने भूखंड उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली असून यासंदर्भातील शासन आदेश सोमवारी जारी करण्यात आला. ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर, जितो एज्युकेशनल आणि मेडिकल ट्रस्ट यांच्या माध्यमातून हे रुग्णालय सुरू होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर अंतिम मोहोर उमटवण्यात येणार आहे.

कर्करुग्णांचे वाढते प्रमाण, महागडे उपचार आणि मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयावर येणारा ताण या बाबी लक्षात घेऊन ठाण्यात अत्याधुनिक उपचारांची सोय असलेले सुसज्ज असे कर्करोग रुग्णालय असावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. त्यांच्या सूचनेवरून ठाणे महापालिकेने टाटा मेमोरिअल सेंटर समवेत अशा प्रकारचे रुग्णालय उभारण्याबाबत चर्चा केली. टाटा मेमोरिअल सेंटरने याबाबत स्वारस्य दाखवले. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने याबाबतचा ठराव करून माजिवडे येथील रुस्तमजी गृहसंकुलातील सुविधा भूखंडाअंतर्गत प्राप्त झालेला भूखंड या प्रकल्पासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती नगरविकास विभागाला केली होती.

- Advertisement -

नगरविकास विभागाने सदरचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया नाममात्र दराने देण्यास ठाणे महापालिकेला मंजुरी दिली आहे. टाटा मेमोरिअल सेंटरसारख्या, देशातील सर्वोत्तम कॅन्सर रुग्णालय चालवण्याचा अनुभव असलेल्या रुग्णालयाच्या माध्यमातून या नव्या रुग्णालयाचे परिचालन होणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि अद्ययावत उपचार किफायतशीर दरात उपलब्ध होतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -