Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई महिला अग्निशामक भरती निकषात न बसणारे उमेदवार अपात्र

महिला अग्निशामक भरती निकषात न बसणारे उमेदवार अपात्र

Subscribe

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अंतर्गत १३ जानेवारी रोजीपासून सुरू झालेली महिला अग्निशामक पदासाठीची भरती प्रक्रिया शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणी यांबाबत निश्चित केलेल्या निकषानुसारच राबवलेली आहे. भरतीसाठी दिलेल्या वेळेच्या आत येणाऱ्या उमेदवारांना विहित मानक पूर्ण केल्याने पात्र ठरविण्यात आले आहे, असा दावा अग्निशमन दलातर्फे करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अंतर्गत १३ जानेवारी रोजीपासून सुरू झालेली महिला अग्निशामक पदासाठीची भरती प्रक्रिया शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणी यांबाबत निश्चित केलेल्या निकषानुसारच राबवलेली आहे. भरतीसाठी दिलेल्या वेळेच्या आत येणाऱ्या उमेदवारांना विहित मानक पूर्ण केल्याने पात्र ठरविण्यात आले आहे, असा दावा अग्निशमन दलातर्फे करण्यात आला आहे. तसेच, ४ फेब्रुवारी रोजी दहिसर येथील मैदानात भरती प्रक्रिया सुरू असताना ज्या महिला उमेदवारांना निकषानुसार अपात्र ठरविण्यात आले त्यापैकी काही उमेदवारांनी परिस्थितीचा विपर्यास करून प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे आणले. प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देऊन जनमानसात अग्निशमन दलाबाबत गैरसमज पसरवला आहे, असा आरोप करीत अग्निशमन दलाने स्पष्टीकरण दिले आहे. (Candidates who do not fit the women firefighter recruitment criteria are ineligible)

अग्निशमन दलाने आतापर्यंत राबवलेल्या भरती प्रक्रियेचे संपूर्ण चित्रीकरण उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेच्या चित्रीकरणाची फेरतपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये जर तक्रारदार उमेदवारांबाबत काही चूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यास ‘त्या’ अपात्र उमेदवारांना न्याय देण्यात येईल, असेही अग्निशमन दलाने म्हटले आहे.

- Advertisement -

वास्तविक, अग्निशामक पदाच्या या ९१० जागांच्या भरती प्रक्रियेत १३ जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण ४२ हजार ५३४ उमेदवार दाखल झाले. त्यातील १६ हजार ५७१ उमेदवार अपात्र ठरले. तर २५ हजार ९६३ जण पात्र ठरले. पात्र उमेदवारांतील १४ हजार ५९६ जणांनी मैदानी चाचणी आदी बाबी पूर्ण केल्या आहेत. तर उर्वरित ११ हजार ३६७ जणांची चाचणी केली जाणार आहे, असे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

मुंबई अग्निशामन दलाच्या अग्निशामक संवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांची सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दहिसर (पश्चिम) मधील लोकनेते गोपीनाथ मुंडे मैदान या ठिकाणी राबवलेल्या या भरती प्रक्रियेसाठी सकाळी आठ वाजेपर्यंत प्रवेशद्वाराजवळ रांगेत उपस्थित शेवटच्या उमेदवारास आत प्रवेश दिला जातो. वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नाही. या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी चित्रीकरण देखील करण्यात आले आहे. त्याची देखील मदत आवश्यक तिथे घेतली जाते. भरतीमध्ये शारीरिक उंची मोजण्याची आणि अन्य साधने देखील नियमानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी प्रमाणित करून दिलेली आहेत, असे स्पष्टीकरण मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

पुरुष उमेदवारांची भरती प्रक्रिया संपल्यानंतर, ४ फेब्रुवारी रोजी महिला उमेदवारांच्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना अंदाजे ७ हजार महिला उमेदवार भरतीसाठी आल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार उंचीची प्रथम चाचणी केल्यानंतर एकूण ३ हजार ३१८ महिला उमेदवारांना प्रथम दर्शनी पात्र करून मैदानामध्ये दाखल करून घेतले.

अग्निशमन दलाच्या निकषांमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांनाच क्रमांक (चेस्ट नंबर) देऊन पुढील मैदानी चाचणीसाठी पाठवले जाते. निकष पूर्ण न करणारे उमेदवार स्वाभाविकच अपात्र ठरतात. मात्र ज्यांना अपात्र ठरविले त्यांनी गदारोळ घातला. त्या अपात्र महिला उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रवेशद्वारा बाहेर बैठे आंदोलन करीत घोषणाबाजी सुरु केली. तसेच त्यांनी घरी जाण्यास नकार दिला. त्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेत मुख्य प्रवेशद्वार व संरक्षक अडथळे लोटण्यास सुरुवात केली. जमावातील एका पुरुषाने महिला पोलीस शिपायास पकडून धक्काबुक्की देखील केली. या कारणाने त्या पुरुषास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी सक्त इशारा दिल्यानंतर हा जमाव काही प्रमाणात नियंत्रित झाला.

त्यावेळी काही अपात्र महिला ,काही लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिकांच्या मागणीवरून पुन्हा २५० महिला उमेदवारांची उंची तपासण्यात आली. त्यापैकी फक्त १६ महिला उमेदवार पात्र ठरल्या. मात्र त्या यापूर्वीच्या भरती प्रक्रियेत वेळेत हजर होत्या का याबाबत चित्रीकरणाची तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण अग्निशमन दलाने दिले आहे.


हेही वाचा – नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्राची तत्वत: मंजुरी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

- Advertisment -