Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे डोंबिवलीच्या पलावा सिटीतील एका फ्लॅटमध्ये गांजाची शेती

डोंबिवलीच्या पलावा सिटीतील एका फ्लॅटमध्ये गांजाची शेती

दोघांना अटक

Related Story

- Advertisement -

डोंबिवली येथील पलावा सिटी येथील एका टूबीएचके फ्लॅटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून गांजाची शेती पिकवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या छाप्यात उघडकीस आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी दोघांना अटक केली असून पलावा सिटी येथील एका फ्लॅटमधून १ किलो गांजा आणि शेतीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. परदेशातून गांजाचे बियाणे आणून अत्याधुनिक पद्धतीने डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये एका फ्लॅटमध्ये त्याचे सेटअप उभे करण्यात आले होते, अशी माहिती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने मुंबई परिसरात केलेल्या कारवाईत जावेद जहांगीर शेख आणि अरशद खत्री या दोघांना अमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक करण्यात आली होती. या दोघांकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती बाहेर पडली होती. हे दोघांनी युरोपमधील नेदरलँड्सची राजधानी मस्टरडॅम येथून गांजाचे बियाणे मागवून हायड्रोपोनिक वीड तंत्राद्वारे डोंबिवलीतील पलावा सिटी या ठिकाणी टूबीएचके फ्लॅटमध्ये या दोघांनी हायड्रोपोनिक वीड (उच्च दर्जाचा गांजा) ची शेती सुरू केली असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई संचालक वानखेडे यांना मिळाली.

- Advertisement -

या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री एनसीबीच्या पथकाने पलावा सिटी येथील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून हायड्रोपोनिक वीडची शेती उद्ध्वस्त केली. या दरम्यान एनसीबीने १ किलो १०० ग्रॅम हायड्रोपोनिक वीड (किंमत सुमारे ५० लाख) ही हस्तगत करण्यात आली आहे. तसेच या फ्लॅटमधून शेती लागवडीचे सेटअप, पीएच नियामक, वनस्पतींचे पोषक घटक, चिकणमाती गारगोटी, पाण्याचे पंप, एअर सर्क्युलेशन सिस्टम, सीओ 2 गॅस सिलिंडर आणि विशिष्ट प्रकारची लाईट्स जप्त करण्यात आले आहे.

अरशद हा मरिन इंजिनिअर असून हायड्रोपोनिक शेतीतील तज्ज्ञ आहे. तसेच जावेद कापणी आणि वितरण व्यवस्था पाहतो. पलावा येथील फ्लॅट या दोघांच्या मालकीचा असून काही वर्षांपूर्वी त्यांनी या कामासाठी हा फ्लॅट विकत घेतला होता, अशी माहिती वानखेडे यांनी दिली. डार्कनेट वेबद्वारे आम्सटरडॅम आणि नेदरलँड्स येथून ही बियाणे खरेदी करण्यात आली होती. हा व्यवहार क्रिप्टो चलन द्वारे करण्यात आला असल्याची माहिती या दोघांनी एनसीबीला दिली आहे. यामध्ये तिसरा पार्टनर रेहान हा दुबईत असून तो यासाठी आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. या उच्च प्रतीच्या गांजाची विक्री हायप्रोफाईल परिसरात करण्यात येत असून आठ हजार रुपये ग्रॅमने त्याची मुंबई, पुणे नाशिक शहरात विक्री करण्यात येत असल्याची माहिती या दोघांनी दिली असल्याचे एनसीबीचे संचालक समीर वानखडे यांनी दिली आहे.

- Advertisement -