महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

‘नाय वरनभात...’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये कारणीभूत

case filed against director Mahesh Manjrekar in POCSO Act

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात मुंबईच्या माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. महेश मांजरेकर यांचा अलिकडेच रिलीज झालेला ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट वादग्रस्त ठरला होता.

वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याने महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पोस्को कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. महेश मांजरेकर यांच्याकडून अद्याप याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही.

14 जानेवारीला ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृश्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आला होता. तसेच चित्रपटांतील आक्षेपार्ह दृश्यांनाही कात्री लावण्यात आली होती.