अरूण सावरटकर
मुंबई : सुमारे 70 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उमर बाबू सय्यद, तुफेल उमर सय्यद आणि दानिश उमर सय्यद अशी या तिघांची नावे असून या तिघांवर भिशी गुंतवणुकीच्या नावाने दोन व्यावसायिक बंधूंची फसवणूक केल्याचा आरोप आहे. (case filed against father son in 70 lakh fraud case cheating brothers in the name of Bhishi)
या तिघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत साकीनाका परिसरात राहतात. उमर हा त्यांचा परिचित असून त्यानेच त्यांच्या हॉटेल व्यवसायादरम्यान त्यांना हॉटेलची जागा भाड्याने घेण्यासाठी मदत केली होती. उमर हा प्रॉपटी एजंट असून तो साकिनाका येथे राहत होता. त्याने त्याची दोन मुले तुफेल आणि दानिश याच्या मदतीने भिशी सुरू केली होती. त्यात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले होते.
हेही वाचा – Maharashtra : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची मदत; मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती
चांगल्या परताव्याच्या आमिषाने तक्रारदारांना भिशीमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासह त्यांच्या भावाने त्याच्या दोन स्वतंत्र भिशीमध्ये दरमाह पाच लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र भिशीचे पैसे देण्याची वेळ आल्यानंतर त्याने इतर सभासदांनी पैसे जमा केले नसल्याचे सांगून त्यांना पैसे देण्यास नकार दिला. सभासदाकडून पेसे मिळत नसल्याने त्याने दोन्ही भिशी बंद केल्याचे सांगितले. त्यामुळे या दोन्ही बंधूंनी उमरसह त्याच्या दोन्ही मुलांकडे पैशांची मागणी सुरू केली होती. मात्र ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी साकीनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पिता-पुत्रांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर उमर सय्यद आणि त्याची दोन मुले दानिश तसेच तुफेल या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त
Edited by : Ashwini A. Bhatavdekar