घरमुंबईआधुनिक कचरापेट्यांमधून सेन्सॉर चीप गायब

आधुनिक कचरापेट्यांमधून सेन्सॉर चीप गायब

Subscribe

ठाणे महापालिकेच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कचरा पेट्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी तो कुठेही टाकण्याच्या नागरिकांच्या सवयीला लगाम घालण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच नवनवीन क्लुप्त्या आणते. त्यापैकी नियमितपणे कचरापेटीचा वापर करणार्‍या नागरिकांसाठी कचरा टाका आणि सोने जिंका’, अशी योजना प्रशासनाने खासगी संस्थेच्या माध्यमातून जाहीर केली. कचरापेटी अर्थात टेकबिनच्या पडद्यावरील क्यूआर कोड’च्या माध्यमातून याची नोंद घेऊन त्याआधारे विजेत्याची निवड होणार होती, तसेच या टेकबिनमध्ये ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी असणार्‍या या दोन कप्प्यांमध्ये सेन्सॉर चीप बसवण्यात आली होती. तिला बारकोड असून तो मोबाइलद्वारे मॅच केल्यानंतर कचरा टाकणार्‍यांसाठी पेटीएममध्येही सवलत मिळणार होती. मात्र, ही योजना कार्यान्वित होण्याआधीच टेकबिनमध्ये अशाप्रकारची चीपच नसल्याचे उघड झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी एकूण दोनशे टेकबिन ठेवल्या होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मासुंदा तलाव आणि सॅटीससह स्टेशन परिसरात सुमारे शंभर टेकबिन ठेवण्यात आल्या. ज्यात ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र कप्पे असून त्यामध्ये कचरा साठवणुकीसाठी पिशवी ठेवण्यात आली आहे. या दोन कप्प्यांमध्ये सेन्सॉर चीप बसवण्यात आली आहे. जिच्याद्वारे नागरिकांच्या मोबाईलमधून बारकोड मॅच होणार होता. काही जाणकार ठाणेकरांनी याबाबत प्रत्यय घेण्याचा प्रयत्न केला असता, अशी कोणतीही सेन्सॉर चीप या टेकबिनमध्ये नसल्याचे आढळून आले आहे. या एका सेन्सॉर चीपची किंमत अंदाजे पाच ते सहा हजार रुपयांच्या घरात आहे. त्या चोरीला गेल्याचा कांगावा कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे या भागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ रहावीत यासाठी प्रयत्न केले जात असून त्यासाठी विविध उपक्रमही राबवले जात आहेत. याशिवाय, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान राबवले जात आहे. त्यानंतरही स्वच्छ शहरांच्या यादीत ठाण्याचा क्रमांक वधारत नाही. यावर पर्याय म्हणून विविध आमिषे दाखवून नागरिकांनी कचरापेटीचा जास्तीत जास्त वापर करावा हा हेतू होता. त्याचे उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनी पालिकेचे विद्यमान आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते झाले होते.

स्मार्ट ठाणे, क्लीन ठाणे’ यासारखे अनेक स्वच्छता संदेश ठाण्यातील स्टेशन परिसरातील टेकबिनवर सतत झळकल्यामुळे ठाणेकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत होते. त्यातच कचरा टाका सोने जिंका, पेटीएममध्ये सवलत यामुळे ठाणेकरांमध्ये या इलेक्ट्रॉनिक आणि अत्याधुनिक अशा या टेकबिन कुतुहलाचा विषय ठरला होता. मात्र, इतर योजनांप्रमाणेच यालाही भ्रष्टाचाराची कीड लागली आणि ठाणेकरांच्या पदरी निराशाच पडली.
– सुभाष ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -