शिवीगाळ करत मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

narayan rane

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केले हे त्यांना एका शब्दानेही सांगता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळी करत मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा केली. मुख्यमत्र्यांनी जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी होती, अशा शब्दांत भाजप नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री कुठल्या भाषेत बोलू शकतात याचा अंदाज राज्यातील जनतेला आहे. आमचे हिंदूत्व चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी कोण चूल पेटवते? हे मात्र सांगितले नाही. तुम्ही चूल पेटवणारे आहात तर गेल्या अडीच वर्षांत किती चूल पेटवल्या त्या सांगा? किती लोकांना रोजगार नोकर्‍या दिल्या? राज्यात उद्योग किती आणले, असा सवाल राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत आपल्या सरकारच्या अडीच वर्षांतील कामगिरीविषयी बोलणे अपेक्षित होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांत राज्यातील सामान्य माणसाच्या हिताचा एकही मुद्दा उपस्थित केला नाही. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना ठाकरे सरकारने दमडीही दिली नाही. घरात बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सरकार चालविणार्‍या मुख्यमंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या समाज घटकांच्या वेदना, व्यथा कळल्याच नाहीत. आपल्याकडे सांगण्यासारखे काहीही नसल्याचे ठाऊक असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी असभ्य, शिवराळ भाषेचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

भाजप आणि हिंदुत्वाशी गद्दारी करत मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंनी आपण सत्तेवर आल्यावर किती रोजगार दिले याचा हिशोब सांगण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागून निवडून आलेल्या शिवसेनेने आता मोदी यांच्यावर टीका करून आपला विश्वासघातकी चेहरा दाखविला आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.

मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दुर्गंधी

१५ मे पर्यंत ७५ टक्के नालेसफाई व्हायला पाहिजे होती, मात्र ३४ टक्केच झाली, तरीही पाठ थोपटून घेताहेत. मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. सत्ताधार्‍यांनी मुंबई बकाल केली आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार भारतात सोडा जगाच्या पाठीवर नसेल. एका बाजूला भ्रष्टाचार करायचा दुसर्‍या बाजूला कौतुकाची पुस्तके छापायची, अशी टीका नारायण राणे यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर केली. कोरोनाकाळात १ लाख ६० हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमवला तरी आपली पाठ थोपटून घेत आहेत. कोरोनाच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, तरी पाठ थोपटून घेताहेत, असे राणे म्हणाले.

दिशा, सुशांतचे आयुष्य उद्ध्वस्त
राणे यांनी पुन्हा एकदा दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या मुद्यावर भाष्य केले. दिशा सालियान आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी म्हटले.