मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून दोन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आले आहेत. या ब्लॉकमुळे अनेक गाड्यांवर परिणाम होणार असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Central Railway Three special traffic and power blocks on Central Railway Mega rush of passengers)
पहिला ब्लॉक
मध्य रेल्वे दिवा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर पूल क्रमांक 45/2 आणि 45/3 साठी गर्डर लाँच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करणार आहे. दिवा आणि कोपर दरम्यान अप आणि डाउन मार्गावर हा ब्लॉक असेल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक जानेवारी महिन्याच्या वीकेंडलाच म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या रात्री घेतला जाणार आहे. त्यानुसार, 12 व 13 जानेवारी, 19 व 20 जानेवारी, 24 व 25 जानेवारी आणि 2 व 3 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ब्लॉक घोषित करण्यात आला असून, नियोजित तारखेला रात्री 23:15 वाजल्यापासून ते पहाटे 05:15 वाजेपर्यंत या ब्लॉकचा कालावधी असेल.
ब्लॉक कालावधीत मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द
- ट्रेन क्रमांक 61004 दिवा – वसई रोड
- ट्रेन क्रमांक 61005 वसई रोड – दिवा
- ट्रेन क्रमांक 61006 दिवा – वसई रोड
- ट्रेन क्रमांक 61007 वसई रोड – दिवा
मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
- ट्रेन क्रमांक 22193 दौंड – ग्वाल्हेर 2 तासांसाठी नियमित (रेग्युलेट) केली जाईल.
- ट्रेन क्रमांक 11049 अहमदाबाद – कोल्हापूर 15 मिनिटांसाठी नियमित (रेग्युलेट) केली जाईल.
- ट्रेन क्रमांक 12297 अहमदाबाद – पुणे 45 मिनिटांसाठी नियमित (रेग्युलेट) केली जाईल.
दुसरा ब्लॉक
मध्य रेल्वेकडून कर्जत यार्डच्या सुधारणच्या पार्श्वभूमीवर कर्जत स्थानकावरील पोर्टल अनलोडिंगचे काम केलं जात आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार 10 जानेवारी आणि रविवार 12 जानेवारी रोजी दिवसा केले जाणार आहे. भिवपुरी रोड आणि पळसधारी स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन या मार्गावर हा ब्लॉक असेल. तसेच, सकाळी 11:20 ते दुपारी 13:05 या कालवधीत ब्लॉकचे काम केले जाणार आहे.
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचालन
- या ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरीय सेवा रद्द राहतील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9:30 ते 11:14 दरम्यान कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.
- कर्जत येथून सकाळी 11:19 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात येतील.
- 11014 कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि कल्याण येथे उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल येथे थांबेल.
तिसरा ब्लॉक
मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड सुधारण्याच्या कामासाठी तिसरा ब्लॉक रविवार 12 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन मार्गावर हा ब्लॉक असेल. तसेच, रविवारी दुपारी 13:50 ते 15:35 या कालावधीत कर्जत स्थानकावरील पोर्टल अनलोडिंगचे काम केले जाणार आहे.
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचालन
- बदलापूर आणि खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – खोपोली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.१९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी गाडी अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.४० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी गाडी बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
- कर्जत येथून १३.५५ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन आणि खोपोली येथून १३.४८ वाजता सुटणारी खोपोली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन अंबरनाथ येथून सुटेल. तसेच, कर्जत येथून १५.२६ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन बदलापूर येथून सुटेल.
- ट्रेन क्रमांक 22194 ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस दुपारी २:५० ते ३:३५ पर्यंत चौक येथे रेग्युलेट करण्यात येईल.
हेही वाचा – Viral Video : तळघरातून बाहेर पडल्या बारबाला; व्हायरल व्हिडीओवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा