‘ईडी’ला भाजप जबाबदार नाही – चंद्रकांत पाटील

'ईडी'ला भाजप जबाबदार नाही अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

chandrakant-dada-patil

ईडीमध्ये सरकारची काहीच भूमिका नसून यामध्ये सरकारचा काहीही संबंध नाही. ही कोर्ट ऑर्डर आहे. या कोर्ट ऑर्डरनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने आपली भूमिका घेतली आहे. त्यामुळे यामध्ये भाजप सरकारचा काही संबंध नाही. त्यामुळे जी जनहित याचिका दाखल केली आहे त्यामध्ये भाजपाचा कोणताही संबंध नाही. दरम्यान, यापूर्वीही कॉंग्रेसचे सरकार होते. त्यामुळे या मागे कोणाचा हेतू आहे ते तुम्ही ठरवा. तसेच हे सर्व कोर्टाचे काम असून हे सर्व ठरवेल. आपण कोर्ट नाही‘, असा असा खुलासा महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. 

घोटाळा २५ हजार कोटीचा की, १२ हजार कोटीचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत आपल्यावर नाहक आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. या आरोपाला पाटील यांनी उत्तर दिले आहे. राज्य सहकारी बँकेच्या कामात भ्रष्टाचार झाला, असे तत्कालीन काँग्रेस सरकारला वाटले म्हणून २०११ साली तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशी लावली. घोटाळ्याची व्याप्ती १०० कोटी रूपयांपेक्षा अधिक असल्याने आपसूकच हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) गेले. या संपूर्ण बाबी घटनेनुसारच सुरू आहेत. यात कोणाला मुद्दामहून त्रास देण्याचा किंवा गोवण्याचा प्रश्न येत नाही, असे पाटील म्हणाले. राज्य बँकेची चौकशी काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाली. रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमले. यात भाजप सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठेच संबंध आला नाही. तसेच घोटाळा २५ हजार कोटीचा की, १२ हजार कोटीचा, असे सरकारने कधीच कुठेही म्हटले नाही. आता तो याचिकाकर्ता जर भाजपचा आहे, असे त्यांना वाटत असेल तर त्याला तसे विचारावे, असा टोला पाटील यांनी लगावला.

राज्य सरकारने भाजप नेत्यांच्या चार कारखान्यांना नियमबाह्य पध्दतीने कर्ज दिल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. याबद्दल विचारले असता, तसे जर वाटत असेल तर त्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय संबंधिताना खुलासा असल्याचा सल्ला पाटील यांनी दिला.

खटले चालवून निवडणुका जिंकता येत नाहीत

विरोधकांवर खटले चालवून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यामुळे आम्हाला, असे करण्याची गरजच नाही. आम्ही आमच्या कर्तृत्वावर आणि कामावर निवडणुका जिंकतो, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीच्या काळात सरकारकडून मुद्दामहून कारवाया केल्या जात असल्याच्या अजित पवार यांच्या आरोपाचा समाचार घेतला.


हेही वाचा – राजीनाम्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना झाले अश्रू अनावर!