घरमुंबईकल्याणमधील सेंच्यूरी कारखान्यात रासायनिक टँकरचा स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

कल्याणमधील सेंच्यूरी कारखान्यात रासायनिक टँकरचा स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

Subscribe

सिद्धार्थ गायकवाड : कल्याण जवळ असलेल्या शहाड येथील सेंच्यूरी रेऑन कारखान्यात सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान रासायनिक द्रवाने भरलेल्या टँकरचा अचानक स्फोट झाल्याने या दुर्घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. स्फोटाच्या आवाजाने किमान एक ते दीड किलोमीटर परिसराला भूकंपाप्रमाणे हादरा बसल्याचे यावेळेस स्थानिकांनी सांगितले आहे. घडलेल्या घटनेने कामगार वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यवस्थापन स्फोटाच्या नेमक्या घटनेचा शोध घेत आहेत. (Chemical tanker explosion at Century factory in Kalyan Three workers died the number is likely to rise)

हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची ताकद…; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंचे लक्षवेधी ट्वीट

- Advertisement -

कल्याण मुरबाड रोडवर असणाऱ्या सेंच्यूरी रे ऑन कारखान्यात विविध घातक रसायनाने भरलेले टँकर उत्पादन प्रक्रियेसाठी पुरवठा करण्यासाठी येत असतात. आज सकाळच्या सुमारासही कारखान्यातील आवारात घातक रसायनाने भरलेला टँकर खाली करण्यासाठी आला होता. मात्र अचानक सी एच टू विभागात भरलेल्या टँकरचा स्फोट होऊन कारखान्यातील कामगार राजेश श्रीवास्तव (46), अनंत डिंगोरे (50) व शैलेश यादव (26) हे तिघे स्फोटामध्ये जागेवरच ठार झाले आहे. या स्फोटात सहा कामगार गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सागर झाल्टे, पंडित मोरे, अशोक वर्मा व अन्य जखमींवर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटात जखमी झालेल्या कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – पुढील तीन दिवस मान्सून सक्रिय राहाणार; वाचा, तुमच्या भागात कसा असणार पाऊस

- Advertisement -

कारखान्यात घडलेली स्फोटक घटना कामगार वर्गासाठी धोक्याची घंटा ठरू लागली असून हजारो कामगारांचा सुरक्षितेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. शासनाचे संबंधित अधिकारी वर्ग व संबंधित विभाग कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत चालढकल करीत असल्याचा आरोप येथील कामगारांनी करून त्यांची ही याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्फोटाच्या घटनेबाबत सेंचुरी व्यवस्थापन अडचणीत आल्याचे सांगितले जात असून कामगार वर्गात या घटनेने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान व्यवस्थापनातील आपत्कालीन पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणल्याचे सांगितले आहे. नेमका अपघात कशामुळे घडला याचा शोध घेण्याचे काम व्यवस्थापनाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या परिवाराला दहा लाखांची तातडीची आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि राहण्यासाठी कारखान्याच्या वसाहतीत खोली देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळाला उल्हासनगर विभागाचे भाजपा आमदार कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पप्पू कलानी, आमदार रोहित पवार, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी तसेच अन्य विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट दिली. कारखाना परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -