मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट, ‘या’ विषयावर चर्चेची शक्यता

Chief Minister called on the Chief Justices of the High Court
Chief Minister called on the Chief Justices of the High Court

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यामूर्तींची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील निकालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री न्यायमूर्तींच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर तयार झालेल्या राजकीय पेचावर कोणता मधला मार्ग काढता येईल, याबद्दलची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यातील ही सदिच्छा भेट असल्याची माहिती न्यायालय प्रशासनाने दिली आहे.

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका मानण्यात येतो आहे. याबाबत नेमका काय मधला मार्ग काढता येईल, यावर मुख्यमंत्री आणि न्यायमूर्ती यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुख्यमंत्री आणि न्यायमूर्ती यांच्यात याअगोदरही दोन ते तीन वेळा भेटी झाल्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दोन वेळा मुंबई उच्च न्यायालयात येऊन मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनीही सह्याद्री-वर्षा येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अशा भेटी वरचेवर होत असतात.

गेल्या काही दिवसात खासदार संजय राऊतांनी उघडपणे न्यायव्यवस्थेवर टीका केली होती. त्यासाठी एका वकील संघटनेने शिवसेना खासदारांसह, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, यांच्याविरोधात अवमान केल्याबाबत कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका केली होती. या याचिकेवरही मुख्यमंत्री आणि न्यायमूर्तींमध्ये चर्चा होऊ शकते, तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.