घरमुंबईमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर आदी उपस्थित होते. (Chief Minister, Deputy Chief Minister took last darshan of senior actress Sulochanadidi)

मुख्यमंत्री म्हणाले की, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. महाराष्ट्राला आणि सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या वात्सल्यमूर्ती होत्या. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून ‘आई’ ची भूमिका अतिशय उत्तमरित्या त्यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटात काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम देणाऱ्या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की, आपल्यातले कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे”, अशा शब्दांत राज्य शासनाच्या वतीने सुलोचनादीदींना मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisement -

सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावे अशी आहेत, ज्यांचे कार्य आणि कर्तृत्वामुळे ते अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांना प्रचंड आदर आहे. त्यातील एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकाच्या भूमिकेनंतर आईच्या भूमिका साकारल्या, त्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात बघितले आहे. अतिशय सोज्वळ आणि ममत्त्व वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सुलोचनादीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांपेक्षाही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल”, अशा शब्दांत फडणवीस यांनी सुलोचनादीदींना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुलोचनादीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

50 हून अधिक मराठी चित्रपटात साकारल्या मुख्य भूमिका

सुलोचना लाटकर यांनी 40 च्या दशकात मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली आणि अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेपासून ते चरित्र भूमिकांपर्यंत काम केलं आहे, तर त्यांनी 250 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित

सुलोचना दीदी यांना 1999 मध्ये पद्मश्री तर 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. शिवाय त्यांचा इतर अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -