घरमुंबईमुख्यमंत्री आमचा, जागा ५०-५०

मुख्यमंत्री आमचा, जागा ५०-५०

Subscribe

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युतीचा प्रस्ताव

पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुटलेली शिवसेना-भाजपची युती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राममंदिर – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या रुपाने पुन्हा बहरली आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली जाईल. शिवसेनेेने देशभरातील भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट ओसरत असल्याचे पाहून कितीही आमदार निवडून येवोत, मुख्यमंत्री आमचाच ही अट घातल्याने भाजपचे नेते चक्रावले आहेत.

तसेच लोकसभेसोबत विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय विद्यमान आमदारांच्या संख्याबळावर न होता जागावाटप फिफ्टी फिफ्टी व्हावे अशी इच्छा मातोश्रीकडून व्यक्त करण्यात आली आहे. सेनेच्या या गुगलीमुळे राज्यातील भाजपचे नेते गोंधळले असले तरी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत युती झालीच पाहिजे, असा आदेश दिला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे युतीबाबत थेट बोलत असून अमित शहा मातोश्रीशी थेट संपर्कात असल्याचे समजते.

- Advertisement -

लोकसभेचे जागावाटप

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २४, शिवसेना २० आणि मित्रपक्षांनी ४ जागा लढवल्या होत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी विधानसभेचेही जागावाटप व्हावे ही शिवसेनेची इच्छा आहे. तसेच लोकसभेत जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाने ठेवाव्यात आणि हरलेल्या जागांमध्ये फेरबदल करता येऊ शकेल असे शिवसेनेचे म्हणणे आहे. पालघरची जागा पोटनिवडणुकीत भाजपकडे गेली असली तरी शिवसेनेला आगामी जागावाटपात पालघर आपल्याकडे हवी आहे, अशी मागणी आम्ही भाजपकडे केल्याची शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

विधानसभेसाठी जागावाटप

२०१४मध्ये लोकसभेत युतीनंतर विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली होती. स्वतंत्रपणे लढून भाजपच्या 122 आणि शिवसेनेच्या 63 जागा निवडून आल्या होत्या. मात्र असे असले तरी विधानसभा जागावाटपात अर्ध्या जागा म्हणजे १४४ जागा शिवसेनेला मिळाव्यात अशी मातोश्रीची इच्छा आहे. युती करायची झाल्यास कोणत्याही परिस्थितीत कितीही जागा येवोत मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशीही अट शिवसेनेकडून भाजपला घातल्याने राज्यातील नेते बुचकळ्यात पडले आहेत.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाबाबत बैठका पार पडत आहेत. पडद्यामागे चर्चाही सुरू असून , युती करण्यासाठी शिवसेनेने भाजपसमोर ठेवलेल्या अटी समोर आल्या आहेत. शिवसेनेच्या या अटी भाजपने मान्य केल्या तरच युती होईल, असे शिवसेनेकडून ठासून सांगण्यात आले आहे. केंद्रात भाजपला पुन्हा सत्ता हवी असेल तर महाराष्ट्र जिंकणे हे भाजपचे लक्ष आहे. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह उत्तर प्रदेश या राज्यांत भाजपचे कमळ कोमेजले आहे. तसेच मागिल तीन महिन्यांत देशपातळीवर भाजपची पिछेहाट होत असल्याने भाजप शिवसेनेसमोर झुकते घेत असल्याचे चित्र गेले काही दिवसांपासून दिसत आहे.

भाजपचे १२२ आमदार आणि शिवसेनेचे ६३ आमदार असे मिळून १८५ आमदार होतात. त्यामुळे उर्वरित १०३ विधानसभेच्या जागांमध्ये फिफ्टी फिफ्टीचा वाटा द्यावा असा मतप्रवाह भाजपच्या कोअर कमिटीत आहे. पण शिवसेनेला नेमके हेच नको आहे. 288 पैकी 144 जागांवर शिवसेना दावा करत असल्याने जागावाटपाची थांबलेली चर्चा आता पुन्हा नव्याने सुरू होईल, असे भाजपचे नेते सांगताहेत. शिवसेेनेला कोणत्याही परिस्थितीत नाराज करू नये,असा आदेशच पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी स्मारकासाठी 100 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. तसेच प्रसारमाध्यमांसमोर भाजपचे सर्व नेते एकमुखाने, एकसुराने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत युती होणारच,असे सांगत आहेत.

चंद्रकांतदादा, मुनगंटीवार, तावडेंना युतीचा विश्वास
राज्यात युती इतकी भक्कम आहे की सौम्य काय किंवा तीव्र धक्के बसले तरी काहीही फरक पडणार नाही. काही तडे गेले असतील ते भरुन निघतील. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे काय म्हणणे आहे, ते तुम्ही छापा. युतीचे वैशिष्ट्ये असे आहे, की एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्र होणार नाहीत तर त्या वेगवेगळ्या होतील, अशी भविष्यवाणीही चंद्रकांतदादा यांनी केली. मुंबईत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि नाशिकात अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी युती होणारच असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपाच्या चर्चेत भाजपाकडून मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हे चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे युतीबाबत थेट बोलत असून पक्षाध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीशी सतत संपर्कात असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

युती होणारच
मुंबई 8आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यानंतर शिवसेना व भाजपच्या युतीकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. परंतु दोन्ही पक्ष एकमेकांवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे युतीबाबत सांशकता निर्माण झाली होती. मात्र महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे यांनी हा संभ्रम दूर करत लोकसभेसोबत विधानसभेतही युती होणारच असा विश्वास ‘आपल महानगर’शी बोलताना व्यक्त केला. युती न झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर आपला निभाव लागणार नाही, अशी भावना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना व भाजपची शंभर टक्के युती होणार असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

युतीच्या वावड्याच – संजय राऊत
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत भाष्य करताना, युतीच्या वावड्या उठत आहेत. युती होणे शक्य नाही. आमच्यापर्यंत युतीची बोलणी करण्यास कुणीही आलेले नाही. युतीबाबत बोलणी कोण करणार याचा आम्ही शोध घेत आहोत. त्यामुळे युतीचे वृत्त निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शिवसेना मुंडावळ्या बांधून युतीच्या प्रपोजलची वाट बघत राहिलेली नाही. आम्ही स्वबळाची घोषणा यापूर्वीच केली आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा युतीचा फॉर्मुला

*आमदार कितीही येवोत, मुखमंत्री शिवसेनेचा
*विधानसभेसाठी जागा वाटप फिफ्टी-फिफ्टी
*लोकसभेसोबत विधानसभेचे जागा वाटप

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -