पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाल्यास अधिकार्‍यांना घरी पाठवणार – मुख्यमंत्री

यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा नीटपणे झाल्यास महापालिकेच्या अधिकार्‍यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल, मात्र जर नालेसफाईची कामे केल्यानंतरही मुंबईची तुंबई झाल्यास व त्याचा त्रास मुंबईकरांना झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करून त्यांना ‘नारळ’ देऊन घरी पाठविण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांना महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यासमोरच झापले. एवढेच नव्हे तर दरवर्षीप्रमाणे केवळ थातूरमातूर नालेसफाईची कामे नकोत. तसेच नदी व नाल्यांमधून किती टक्के गाळ काढला, किती टक्के नालेसफाई झाली याची आकडेवारी व टक्केवारी मला सांगू नका.

ते महत्त्वाचे नाही. वास्तविक मिठी नदी व इतर नद्यांमधील आणि नाल्यांमधील गाळ हा तळापासून म्हणजे अगदी तळाला दगड लागेपर्यंत खोलवर जाऊन काढून प्रामाणिकपणे सफाई कामे करावीत. नालेसफाई कामांची जबाबदारी अधिकार्‍यांवर सोपवा, असे आदेशही त्यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना दिले. जर अधिकार्‍यांनी नालेसफाईची कामे कंत्राटदारांमार्फत प्रामाणिकपणे करून घेतली, गाळ खोलवर जाऊन काढला, पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी पंपाने निचरा करून हटविले तर यंदा पावसाळ्यात सखल भागात अधिक प्रमाणात पाणी साचून राहणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना तसेच सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी बजावले.

वास्तविक नालेसफाई केल्यावरही जर जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास मुंबईत काही सखल भागात पाणी साचू शकते, मात्र पालिकेने कामे अशी करावीत की जास्त पाऊस पडला तरी कोणत्याही परिस्थितीत पावसाचे पाणी कुठेही साचून राहता कामा नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिकेतील संबंधित अधिकार्‍यांना सुनावले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी मिठी नदी, वांद्रे पूर्व येथे, नंतर वाकोला नदी, होल्डिंग पाँड, प्रमोद महाजन, दादर, लव्ह ग्रोव नाला, वरळी आणि लव्ह ग्रोव स्ट्रॉम वॉटर पंपिंग स्टेशन, वरळी येथे पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिपादन केले.

याप्रसंगी मुंबई उपनगर भागाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पालिका आयुक्त इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, आमदार सदा सरवणकर, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, अमेय घोले तसेच पालिकेचे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मिठी नदीतील पाण्याचा रंग बदलणार, फल्ड गेट बसवा
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तळापासून गाळ काढण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. तसेच मिठी नदीला पूर येऊ नये व मिठी नदीतील कचरा, प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मिठी नदीमधील सांडपाण्यामुळे मिठी नदीचे पाणी प्रदूषित व काळे होत असल्याचे सांगितले. मिठी नदीत नोव्हेंबर ते मे महिना या कालावधीतच सांडपाणी सोडले जाते.

ते सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याने मिठी नदीतील पाण्याचा काळा रंग भविष्यात नक्कीच बदलणार असल्याची ग्वाही दिली. समुद्राला मोठी भरती असताना मिठी नदीला पूर येऊन त्याचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी मिठी नदी व नाले ज्या ठिकाणी समुद्राला, खाडीला मिळतात त्या ठिकाणी फल्ड गेट बसवावेत. त्यामुळे समुद्राचे व खाडीचे पाणी उलटे मिठी नदीत शिरणार नाही, अशी सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्त चहल यांना केली. तसेच वाकोला नदी येथे नदीकिनारी असलेली माती नदीपात्रात जाऊ नये यासाठी या नदीकिनारी गॅबियन वॉल उभारावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

रेल्वेमार्गातील कल्व्हर्ट आणि नालेसफाई करा
मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावर अथवा कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पावसाळ्यात रेल्वेमार्गावरही पाणी साचून रेल्वे वाहतूक बंद पडू नये यासाठी रेल्वेमार्गालगतचे नाले व कल्व्हर्ट रुंद करा व त्यांची चांगली सफाई करून घ्यावी व जातीने पाहणी करावी. जर दुर्दैवाने नालेसफाई करूनही जास्त पाऊस पडल्याने पाणी साचले आणि त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट बस उपलब्ध करून पर्यायी सुविधा द्यावी, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांना दिले.