घरमुंबईबोर्डीच्या समुद्रकिनारी आजपासून चिकू महोत्सव

बोर्डीच्या समुद्रकिनारी आजपासून चिकू महोत्सव

Subscribe

चिकू फळाचे उत्पादन आणि त्यापासून तयार होणार्‍या विविध खाद्यपदार्थाना चालना देण्यासाठी बोर्डी येथे चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्डीच्या समुद्रकिनारी 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी हा महोत्सव रंगणार असून विविध कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असणार आहे. विशेष म्हणजे यंदा खास चिकू महोत्सव दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

रुरल इंटरप्रिन्युरशिप वेल्फेअर फाऊंडेशन या पर्यटनाला चालना देणार्‍या संस्थेने एमटीडीसीच्या मदतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा महोत्सवाचे आठवे वर्ष आहे. चिकू फळ आणि त्यापासून तयार होणार्‍या वेगवेगळ्या खाद्यपदार्थाना नागरिकांमध्ये रुची निर्माण व्हावी तसेच बोर्डी परिसरातील पर्यटन विकसित व्हावे हा उद्देश आहे. स्वयंरोजगार व गृहउद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या चिकू महोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाखांहून अधिक जणांनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

बोर्डी कॅम्पिंग ग्राऊंड येथे आयोजित करण्यात येणार्‍या या दोन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुनीता बाफना या ‘चिकू की कहानी’ या सत्रामध्ये चिकू फळाच्या वाटचालीबाबत सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबरीने ‘चिकूच्या कट्ट़यावरून’ या सत्रामध्ये स्थानिक उद्योजकांच्या वाटचालीबाबत माहिती देण्यात येणार आहे. वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीची माहिती व खाद्यपदार्थाच्या पाककृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून पारंपरिक आणि भारतीय संगीतावर आधारित करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात येणार आहे. या महोत्सवातून स्थानिक शेतकरी व महिला उद्योजकांना लाभ व्हावा तसेच चिकू फळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.

चिकू महोत्सवात यंदा निसर्गरम्य समुद्रकिनार्‍यालगतच्या रस्त्यावर ‘चिकू महोत्सव दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकारांकडून त्यांच्या पारंपरिक कलाकृतींचे कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. यंदाही ‘चिकू सफारी’ व ‘वायनरी टूर’ या कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या उपक्रमाचे व आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक उत्पादने, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी सुमारे दोनशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -