क्रेडिट सोसायटीच्या दैनंदिन बचतीच्या पैशांचा अपहार

दैनंदिन ठेव योजनेत व्यापारी आणि खातेदारांकडून बचत ठेवीचे पैसे गोळा करून ते पतपेढीच्या न भरता लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे खातेदार आणि दैनंदिन बचत खातेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. दैनंदिन बचत खात्याचे पैसे गोळा करणार्‍या अक्षय भोसले याच्या विरोधात रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राबोडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठाण्यातील सिटीझन को.ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये पिग्मी एजंट असलेले प्रशांत पाटील (34) रा.गोकुळनगर यांनी कामाचा वाढत्या व्यापामुळे दैनंदिन रक्कम वसुली करण्यासाठी अक्षय भोसले (21 रा.काल्हेर,भिवंडी) याला नेमले होते. गेली तीन वर्षे भोसले हा 30 ते 35 खातेदारांची रक्कम दररोज गोळा करीत असे. मंदार कदम हे खातेदार 28 सप्टेंबर रोजी पतपेढीत पासबुक अपडेट करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या खात्यात 13 हजारांची रक्कमच जमा नसल्याचे आढळून आले. त्यानंतर इतर पाच साथीदारांच्या खात्यातील एकूण 2 लाख 18 हजारांची रक्कम देखील पतपेढीत भरलेली नसल्याचे समोर आले. रकमेचा हा अपहार भोसले यानेच केल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे अधिक तपास करीत आहेत.