घरमुंबईरस्ते कामावरून पालिकेत शिवसेना-भाजपात जुंपली

रस्ते कामावरून पालिकेत शिवसेना-भाजपात जुंपली

Subscribe

गेल्या २५ वर्षातील रस्ते कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजपने केली असून रस्ते कामांत भाजपचा खोडा घालतंय, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

मुंबईतील रस्ते कामांबाबतच्या निविदा प्रक्रियेवरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रस्ते कामांबाबतची कमी दराची निविदा रद्द करून फेर निविदा काढण्यात यावी आणि गेल्या २५ वर्षांत झालेल्या रस्ते कामांबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, कामाचा दर्जा राखून कमी दरात रस्ते कामे झाल्याने पालिकेचाच फायदा होणार असताना भाजप उगाचच फेर निविदेची मागणी करून रस्ते कामाला आणखीन उशीर होण्याच्या हेतूने रस्ते कामात खोडा घालत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत, रस्ते कामांच्या निविदांवरून भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा मांडून रस्ते कामांबाबतच्या निविदेत ३०% कमी दरात रस्ते काम करण्यात येणार असल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करून फेर निविदा काढण्याची आणि मागील २५ वर्षातील रस्ते कामांची श्वेत पत्रिका काढण्याची जोरदार मागणी केली.

- Advertisement -

मात्र याबाबतचा प्रशासनाकडून अद्याप प्रस्तावच आलेला नसताना भाजपकडून आक्षेप कशासाठी असा सवाल शिवसेनेतर्फे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अगोदरच रस्ते कामांना उशिर झालेला असताना भाजपकडून या कामांबाबत राजकारण करून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कंत्राटात भाजपचे ठेकेदार आले नाहीत म्हणून त्यांचा आटापिटा सुरु आहे. कमी खर्चाच्या निविदा आल्या तर पालिकेचा फायदाच होणार आहे. मात्र फेर निविदा काढल्याने नुकसान होणार आहे. भाजपची ही भूमिका रस्ते कामांत खोडा घालण्याची आहे, असे आरोप यशवंत जाधव यांनी भाजपवर केले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -