शिवसेना-भाजपचा एकमेकांच्या वार्डात खड्डे बुजवण्याचा स्टंट

शिवसेना भाजपमध्ये खड्डयावरुन जुंपली असल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. शनिवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप नगरसेवकी हेतल गाला यांच्या वॉर्डातील खड्डे दाखवणारी स्पर्धा शिवसैनिकांनी घेतली होती. सेनेच्या या उपक्रमाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडूनही शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या लोकसभा मतदारसंघातील खड्डे भरण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण झाले असताना दोन सत्ताधारी पक्ष मात्र एकमेकांना लक्ष्य करण्यात गुंतले असल्याची प्रतिक्रिया आता सामान्यांकडून व्यक्त होत आहे.

मागच्या आठवड्यात स्थानिक शिवसैनिकांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींची निष्क्रियता दाखवण्याचा प्रयत्न केला होता. खड्ड्यांची जबाबदारी शिवसेनेची नसून निवडून आलेल्या भाजप लोकप्रतिनिधींची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी शालेय विद्यार्थांना घेऊन सदर खड्डयांच्या भोवती बसून “पारदर्शकता आणि पहारेकरी” या विषयावर चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करून भाजप लोकप्रतिनिधींची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला होता.

Shivsena andolan
शिवसेनेने भाजपच्या वार्डात जाऊन खड्ड्यांशेजारी निबंध स्पर्धा भरवली

भाजपवर टिका करणाऱ्यांनी जनतेची कामे करावीत

शिवसेनेच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपची मुबंई महिला सचिव दिव्या ढोले यांनी आज धारावी मतदार संघातील शिवसेनेच्या चार नगरसेवक आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक, आणि शिवसेनेचे खासदार असणाऱ्या धारावी मतदार संघातील खड्डे भरून आव्हान शिवसेनेला प्रति आव्हान दिले आहे. यावेळी दिव्या ढोले यांनी शिवसेनेवर टीका करताना पावसामुळे धारावीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांकडे शिवसेना नगरसेवक आणि खासदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

BJP andolan
भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहूल शेवाळेंच्या मतदारसंघात खड्डे बुजवले

खड्ड्यांमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय. जनतेला मदत करणे भाजपाला महत्त्वाचे वाटते. जनतेला वाहन चालवताना रस्त्यातल्या खड्ड्यांचा त्रास होऊ न देता. भाजपवर टिका करणारे लोक जनतेच्या सोयी आणि सुविधांकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे, अशी उपरोधिक टीका दिव्या ढोलेनी यावेळी केली आहे.

भाजप शिवसेनेला बदनाम करते

भाजपच्या चिखलफेकीवर आशिष शेलार यांच्या मतदार संघात खड्डे बुजवणारे शिवसैनिकि जितेंद्र जनावले यांनी पालिकेचा निधी उपलब्ध असताना सुद्धा भाजपचे नगरसेवक त्यांच्या प्रभागातले खड्डे बुजवत नाहीत, असा आरोप केला. शिवसेनेला मुंबईकरांच्या नजरेत बदनाम करण्याचे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे कटकारस्थान शिवसैनिक उधळून लावेल. ज्या प्रभागात भाजप नगरसेवक आहेत तेथील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून भाजप कामचोर नगरसेवकांना मतदारांसमोर शिवसेना पद्धतीने जाब विचारणे हा काय गुन्हा आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.