मुंबई – “मी गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन ‘संगीत मानापमान’ला आलोय. आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजकीय मानापमानाचे नाट्याच त्यांनी सर्वांसमोर मांडले. त्यासोबतच फडणवीसांनी मिश्किल भाष्य करताना महायुती सरकारमधील मानापमानाचाच एक प्रकारे खुलासा केला.
संगीत मानापमान या नाटकावर आधारित चित्रपट येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलर लाँच वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार शाब्दिक टोलेबाजी केली.
ते म्हणाले की, सलग 113 वर्ष मराठी मनाला भुरळ घालणारे संगीत मानापमान नाटक आहे. या नाटकावर आधारित सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगला मला उपस्थित राहता आले, या क्षणांचा साक्षीदार होता आले याचा मला आनंद आहे. मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता या संगीत नाटकामध्ये आहे. ते नाटक आज रुपेरी पडद्यावर नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे.” असं फडणवीस म्हणाले.
सुबोध भावे यांच्या कामाचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच्या विविध भूमिकांचाही यावेळी उल्लेख केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सुबोध भावे यांनी बालगंधर्व साकारला, भामिनीही साकारली, आता धैर्यधरही ते साकारत आहेत. हा देखील एक योगायोग आहे. आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं. मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं”. यावर उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी भाषेसोबत महाराष्ट्राचे संगितही अभिजात आहे. आपली ही परंपरा समाजमोर आणण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. या नाटकातील 67 पदं ऐकण्याचं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल, पण मला असं वाटतं की, याचं जे सौंदर्य आहे, ते या 14 पदांच्या माध्यमातून या सिनेमातून पोहोचेल. त्यातून नव्या पिढीत उत्कंठा तयार होईल. आपण एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन संगीत मानापमान पाहिलं पाहिजे. ट्रेलर इतका सुंदर आहे, पिक्चर कसा असेल” असे म्हणत त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले.
Edited by – Unmesh Khandale