घरCORONA UPDATEवांद्र्याच्या घटनेवर राजकारण करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं!

वांद्र्याच्या घटनेवर राजकारण करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं!

Subscribe

लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर काही तासांमध्येच मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर गोळा झाले होते. शेकडोंच्या संख्येने अचानक हा जमाव एकत्र आल्यामुळे पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी काही प्रमाणात लाठीचा वापर करावा लागला. मात्र, तुमच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाईल, असं सांगत या सर्वांना परत पाठवण्यात पोलिसांना २ तासांनी यश आलं. या घटनेवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच अशांचे कान उपटले आहेत.

वांद्र्यातल्या परप्रांतीयांना उद्धव ठाकरेंचा दिलासा

वांद्र्यात मोठ्या संख्येने गोळा झालेल्या परप्रांतीय मजुरांना उद्धव ठाकरेंनी खास हिंदीत बोलून दिलासा दिला. ते म्हणाले, ‘इतर राज्यांमधून इथे आलेले काही प्रमाणात घाबरलेत. पण आम्हाला तुम्हाला घरात डांबून ठेवण्याचा आनंद होत नाहीये. आम्ही तुमची काळजी घेण्यासाठी आहोत. तुम्ही काळजी घेऊन राहा इथे. तुमच्यासाठी काही कमी पडलं, तर तेही आम्ही करत आहोत. कुणाचीही इच्छा नाही की तुम्हाला असं बंद करून ठेवावं. ज्या दिवशी लॉकडाऊन उघडेल, त्या दिवशी तुमची व्यवस्था केलीच जाईल. तुम्ही महाराष्ट्रात आहात. काळजी करू नका’.

- Advertisement -

…मी आग लावू देणार नाही

दरम्यान, या मुद्द्यावरून आधी आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारकडे बोट दाखवल्यानंतर भाजपकडून किरीट सोमय्या आणि खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नका. या लोकांच्या भावनांशी खेळून जर कुणी राजकारण केलं, तर तो कुणीही असला तरी महाराष्ट्र सरकार त्याला सोडणार नाही. उगीच गैरसमजाची पिल्लं सोडून त्याला वेगळा रंग देऊन आग भडकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहेत. पण त्यांना मी आग लावू देणार नाही’, असं मुख्यमंत्री म्हणाले,.

कोरोना कुणालाही होऊ शकतो…

सर्वपक्षीयांना आवाहन करताना यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘सगळ्या पक्षांचे नेते हातात हात धरून लढत आहेत. हा व्हायरस जात, पात, धर्म, पक्ष बघत नाही. तो कुणालाही ग्रासू शकतो. जेवढं लवकर आपण या कोरोनाला परतवू, तेवढ्या लवकर हा लॉकडाऊन निघेल. आपल्या एकजुटीच्या जोरावरच आपण त्याला पराभूत करू शकतो. घरीच आराम करा… आरामात आपण हे युद्ध जिंकू’.


वाचा सविस्तर – वांद्रे स्टेशनबाहेर शेकडोंनी परप्रांतीय मजुरांची गर्दी; घरी जाऊ देण्याची मागणी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -