Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई विरोधी पक्षनेत्यांसह महापालिकेतील गटनेत्यांना डावलून मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

विरोधी पक्षनेत्यांसह महापालिकेतील गटनेत्यांना डावलून मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

राज्यात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर शिवसेनेने सरकार स्थापन केले, त्याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आता या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना डावलून आढावा बैठक घेतली आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर शिवसेनेने सरकार स्थापन केले, त्याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आता या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना डावलायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी प्रथमच महापालिका मुख्यालयात महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली. परंतु या बैठकीची कोणतीही कल्पना विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव तसेच सपाचे गटनेते आमदार रईस शेख यांना दिली नाही. मात्र, महापौर, सभागृहनेत्या आणि स्थायी समिती अध्यक्ष मात्र मुख्यमंत्र्यांसमवेत आढावा बैठकीत सहभागी झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यासह गटनेत्यांना डावलून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीबाबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पसरलेली पहायला मिळत आहे.

महापालिकेतील नेत्यांमध्ये नाराजी सूर

मुंबई महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षातील सभागृहात सर्व अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आजवर अनेकदा महापालिका मुख्यालयात आले असले तरी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच ते महापालिकेत आले होते. त्यामुळे महापालिकेतील सर्व गटनेत्यांना याची कल्पना देणे आवश्यक होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आपलीच सत्ता असल्याने महापौरांसह आपल्यासर्व महापालिकेतील नेत्यांना गृहीत धरत केवळ सचिवांसह महापालिकेच्या अधिकार्‍यांना बोलावून चर्चा करत महापालिकेतील सर्व गटनेत्यांचा अवमान केला.

- Advertisement -

महापालिकेतील सर्व गटनेत्यांना बैठकीत सामावून घेतले जाऊ नये, याकरता मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम पत्रिकेची माहिती महापौरांसह सभागृहनेत्यांना लेखी स्वरुपात न देता तोंडी सूचना करत त्यांना आपल्या बैठकीत सामावून घेतले. परंतु, मुख्यमंत्री महापालिकेत येणार असल्याची कोणतीही कल्पना विरोधी पक्षनेत्यांसह इतर पक्षांच्या गटनेत्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे तोंडी सूचना दिल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत ,स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आदी महापालिकेतील शिवसेनेचे नेतेमंडळी मुख्यमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आढावा बैठकीत सहभागी झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या राजशिष्टाचार विभागाच्या अधिकार्‍यांच्या डोक्यावर आता याचे खापर फोडले जाणार असून विरोधी पक्षनेत्यांसह सर्व पक्षांचे गटनेते आणि त्यांचे नगरसेवक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. राज्यातील सरकार हे महाविकास आघाडीचे आहे. त्यामुळे हे मुख्यमंत्री शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाचेही आहेत. परंतु, महापालिकेत मुख्यमंत्री जर शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून मिरवून आमच्या पक्षाच्या नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना महापालिकेत झटका दिल्याशिवाय राहणार नाही,अशीही कुजबूज या आघाडीतील नगरसेवकांमधून ऐकू येत आहे.


हेही वाचा – बाल कर्करुग्णांच्या उपचारासाठी टाटा मेमोरिअलचे नवे उपचार केंद्रे


- Advertisement -

 

- Advertisement -