‘विरोधकांना एवढं दु:ख काय होतंय?’ मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला!

minister uddhav thackarey
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकासआघाडीच्या अर्थसंकल्पावर टीका करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर त्यानंतर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘महाविकासआघाडी सरकारच्या १०० दिवसांच्या पुस्तिकेमधले २६ निर्णय आमचे कॉपी-पेस्ट केलेले आहेत’, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी ‘आमच्या पुस्तिकेमध्ये त्यांच्या योजनांचा समावेश असेल, तर त्याचं त्यांनी कौतुक करायला हवं, त्याचं एवढं दु:ख का होतंय?’ असा प्रतिप्रश्न करत टोला हाणला!

‘शाळा बंद आहेत, मार्क कोण देणार?’

सत्ताधाऱ्यांच्या १०० दिवसांना १०० पैकी फक्त १५ मार्त देत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ‘सध्या शाळा बंद आहेत, त्यामुळे मार्क कुणी देऊ शकत नाही’, असा टोमणा मारला!


वाचा सविस्तर – सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं-देवेंद्र फडणवीस

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. त्यामध्ये मराठी भाषा सक्ती विधेयक, औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ करणे, नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचं नाव मुंबई सेंट्रलला देणे, महिलांच्या प्रश्नावर पूर्ण दिवस चर्चा, दिशा कायद्याचा मसुदा सादर, न्हावाशेवा ब्रीज चिरले गावापासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ५०० किमी महामार्गाची घोषणा, कल्याण क्षेत्रातल्या २७ गावंपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद या निर्णयांचा उल्लेख केला.