रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांचे केंद्राकडे बोट; “दुर्दैवाने केंद्रासोबत आपली जी बोलणी…”

cm uddhav thackeray slams central govt over dharavi redevelopment project
रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांचे केंद्राकडे बोट; दुर्देवाने केंद्रासोबत आपली जी बोलणी...

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाष्य केले आहे. धारावी पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत मात्र केंद्राकडून जागा न मिळाल्याने या प्रकल्पाला गती मिळत नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिली आहे. या सगळ्या योजना आपण जाहीर केल्या, काही करायच्या आहेत पण त्या केवळ आपल्या हातात नाहीत. असा खोचक टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला लगावला आहे.

“आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसे असणार आहे ते ठरवण्याच्या दृष्टीने सहकारी मंत्रीमहोदयांनी जे मुंबईतील कष्टकरी आहेत, जे दुसऱ्यांचे घरं बांधतात पण त्यांची स्वत:ची घरं नाहीत ते सांगितले आहे. मुंबईत अनेकजण येतात, अन्न वस्त्र निवारा शोधतात त्यांना अन्न वस्त्र मिळतं पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकायला त्यांच्याकडे स्वत:चं घर नसतं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा १९९५ ला युतीची सत्ता आली तेव्हा या झोपडपट्टीवासियांना त्यांची हक्काचे मोफत घर मिळालीच पाहिजेत असा विचार मांडला आणि त्यादिशेने पाऊलं टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आज किती वर्षे झाली आपल्या सर्वांना कल्पना आहे, अनेक झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प सुरु झाले पण त्याची गती कासवगतीपेक्षा मंद राहिली,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

“आपण असं ऐकतो की, आजोबा नारळाचे झाड लावतात पण त्याचे फळ नातवाला मिळते असं आपण म्हणतो, आता नातवंडाच्या पुढेही दिवस जात चालले आहेत, फळं लागताहेत पण मलई कोण खाते आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे स्वत:ची हक्काची घरं सोडून जी माणसं ट्रॅन्झीक्ट कॅम्पमध्ये राहात आहेत, काबाडकष्ट करत आहेत त्यांना घर मिळवून देण्यासाठी ज्या योजना आणल्या त्यासाठी तीनही सहकारी मंत्र्यांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार आतापर्यंत कुणीच केला नाही. मुंबईचा सोन्याचा अंडे देणारी कोंबडी असा आतापर्यंत विचार केला गेला सोन्याचं अंडे देताहेत, अंडे घेऊन जाताहेत, पण त्या कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. ती निगा राखणाऱ्या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला मग ते गिरणी कामगार असतील, इतर काबाडकष्ट करणारे असतील, ज्यांनी घाम गाळला, रक्त सांडले त्यांचा विचार कुणीच केला नव्हता तो विचार या सरकारने गांभीर्याने केला
हा विचार कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे त्या सरकारकडून हे मुद्दे मांडले गेले. कामाला गती देण्यात आली आहे, त्यासाठी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मला अभिमान वाटतो,” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

“या सगळ्या योजना आपण जाहीर केल्या, काही करायच्या आहेत पण त्या केवळ आपल्या हातात नाहीत. उदा. धारावीचा पुर्नविकास मला आठवतं मी अनेकदा सांगितले असेल की ज्यावेळी आम्ही कलानगरमध्ये राहायला आलो तेंव्हा चौफेर पसरलेली खाडी होती. विकास झाला, मोठमोठी ऑफीसेस झाली. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झालं, असं म्हणतात की जगातील सर्वात महागड्या जागेपैकी ती एक जागा आहे आणि त्याच्या बाजूला धारावी आहे, धारावीचा विकास झाला पाहिजे पण धारावीचा विकास अजूनही होऊ शकत नाही याचे कारण दुर्देवाने केंद्रासोबत आपली जी बोलणी सुरु आहेत, रेल्वेची जी जमीन आहे त्यासाठी जवळपास ८०० कोटी रुपये दिले गेले आहेत पण अजूनही ,ती जमिन आपल्याला हस्तांतरीत होत नाही. मी रेल्वेमंत्र्यांशी बोललो देखील आहे. अशा काही अडीअडचणीच्या गोष्टी आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

“केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत त्या जागांचे काय केले पाहिजे, त्याचा कसा विनियोग केला गेला पाहिजे याचा नुसता विचार करून चालणार नाही तर केंद्राकडे पाठपुरावा करून त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे. मुंबईतील जनतेसाठी आपण हा  सगळा विषय मांडला. लोकांचं झालं मग लोकप्रतिनिधीचे काय? ३०० आमदारांसाठी घरे बांधणार. सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घरे देत आहोत त्याचाही आनंद आहे, रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाची जी योजना आहे त्यामध्ये आम्ही अनेकदा गती देण्याचा विचार केला. त्यात हा ही विषय मांडला गेला की काही विकासकांनी लुट केली, लुबाडले, त्यांची चौकशी केली जाईल. ज्यांची घरे अडली त्यांचा काय दोष आहे, अशा रखडलेल्या घरांसाठी ॲम्न्स्टी स्कीम आणणार जेणेकरून रखडलेल्या घरांना चालना मिळेल. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करून देशात सर्वात उत्तम उदाहरण उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार, विचार करून घोषणा केली, आता काम करणारअनेक वर्षे रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न आपण सोडवला, बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाला सुरुवात झाली. नोकरदार महिला आणि शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसाठी वसतीगृह बांधतो आहोत. म्हाडाचे सेवाशुल्क किंवा अकृषक कर यामुळे अडकलेल्या रहिवाशांना आपण दिलासा देत आहोत”, असही मुख्यमंत्री म्हणाले.

“मुंबई स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी जे काम करतात त्या सफाई कामगारांसाठी ही आपण विचार केला आहे. मुंबईतील महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे की ज्याप्रमाणे आपण ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला आपण घर देत आहोत, शहरात राहणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण घर देत आहोत  त्याचप्रमाणे आपण सफाई कामगारांना देखील घरे देत आहोत. महाविकास आघाडीचे सरकार केवळ बोलणारे नाही तर जे बोलतो ते करून दाखवणारे सरकार आहे. या मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या व मंत्रिमंडळातील सहकाऱ्याच्यावतीने देतो,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.