घरताज्या घडामोडीराजकीय संकट आलं तर मोडून-तोडून टाकू - उद्धव ठाकरे

राजकीय संकट आलं तर मोडून-तोडून टाकू – उद्धव ठाकरे

Subscribe

‘गेल्या वर्षभरात राज्याने नैसर्गिक संकटांचा सामना केला. नैसर्गिक संकटं येत असतात. नैसर्गिक संकटाचा आपण मुकाबला करूच. पण जर राजकीय संकट कुणी आमच्यावर आणणार असेल, तर हा महाराष्ट्र ते कौतुक मोडून-तोडून दाखवेल’, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्याच्या वर्षपूर्ती सोहळ्यामध्ये सरकारच्या वर्षभराच्या कारकिर्दीची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सरकारमधील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. ‘या सरकारचे जमिनीवर पाय मजबूत आहेत. या मजबूत पायांनी आम्ही एक एक पाऊल टाकत राहू. जनतेच्या आमच्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर दिलंय’

दरम्यान, राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. ‘एक वर्ष आपण काय केलं? असं विचारणाऱ्यांना या पुस्तिकेतून उत्तर दिलं आहे. कोरोनाची साऱ्या जगावर आपत्ती आली आहे. सगळ्यांची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे. पण त्या परिस्थितीत देखील आपण रुग्ण किंवा रुग्णसंख्या या बाबतीत लपवालपवी न करता पारदर्शकपणे सगळं लोकांसमोर ठेवलं आहे. आपले सगळे आकडे खरे आहेत’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस चांगला सहकारी!

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारमधल्या मित्रपक्षाला कोपरखळी मारली. ‘सोनिया गांधींना आजपर्यंत एकदाच भेटलो. पण फोनवर चर्चा होत असते. त्या विचारतात कैसा चल रहा है, हमारे लोग सता तो नहीं रहे है? मी सांगतो चांगलं चाललंय. राष्ट्रवादीपेक्षा चांगले सहकारी आहेत असं मी सांगतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -