घरताज्या घडामोडीआमदारच मुली पळवून आणण्याची भाषा करतात - उद्धव ठाकरे

आमदारच मुली पळवून आणण्याची भाषा करतात – उद्धव ठाकरे

Subscribe

‘राजकारणासाठी अगतिक होऊन महिलांविषयी अपशब्द आणि हिणकस शेरेबाजी करणाऱ्या लोकांची हाजीहाजी करत अशा आमदारांच्या मांडीला मांडी लावून जर आपण बसत असू तर आपल्यासारखे नालायक आणि ढोंगी दुसरे कुणी नाही. मग ही राजकीय अगतिकता असताना कसला जागतिक महिला दिन आपला साजरा करतोय?’ असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. विधानपरिषदेत महिला दिनाच्या निमित्तानं, विधानपरिषदेत आज ”महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण” यासंदर्भातला ठराव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडला. या प्रस्तावावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

‘..असा एकही नतद्रष्ट पक्षात ठेवणार नाही’

‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल, तर नतद्रष्टांचा माज उतरविण्याची गरज आहे. त्यासाठी राजकारणात मी हरलो तरी चालेल. पण एकही नतद्रष्ट मी पक्षात ठेवणार नाही. पण सर्वांची ही तयारी आहे का?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सर्व सदस्यांना उद्देशून विचारला. यावर विरोधकांकडून ‘सुनेचा छळ करणाऱ्या आमदारांविरोधातही कारवाई करणार का?’ असा शेरा मारण्यात आला. त्यावर बोलतानाही ठाकरे यांनी ‘कोणत्याही पक्षाचा असू द्यात, पण महिला अत्याचाराच्या बाबतीत नुसते कायदे कडक करुन चालणार नाही. जो कोणी महिलांचा अपमान करेल, तो कोणीही असेल त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. याची कडक अंमलबजावणी सुरु केल्यानंतर महिलांवरचे अत्याचार कमी व्हायला सुरुवात होईल’, असे सांगितले.

- Advertisement -

‘आपल्यासारखे नालायक आणि ढोंगी दुसरे कुणी नाही’

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना बरोबर वागणूक दिली नसेल तर ते योग्य नाही. मला कुणाची उणीदुणी काढायची नाहीत. मात्र, लोकप्रतिनिधीच जर महिलांवर अत्याचार करत असतील तर या सत्तेचा काय उपयोग?’ असे सांगत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता काही आमदारांवर निशाणा साधला. ‘सैन्य दलातील महिलांबद्दल अपशब्द आणि हिणकस शेरेबाजी करणारे देखील आपल्याला सत्तेसाठी हवे असतील तर आपण कसला जागतिक महिला दिन साजरा करतोय. सत्तेसाठी वाट्टेल त्या लोकांची हाजीहाजी आपण करत असू आणि अशा आमदारांच्या मांडीला मांडी लावून बसत असू तर आपल्यासारखे नालायक आणि ढोंगी दुसरे कुणी नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘महिलांना सुरक्षा द्यायला आपण असमर्थ’

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चीफ ऑफ डिफेन्समध्ये सामील झालेल्या महाराष्ट्राच्या कन्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि लेफ्टनंट जनरल स्वाती महाडिक यांचे कौतुक केले. ‘आपले रक्षण करायला महिला सैन्यात जायला तयार आहेत. पण देशांतर्गत महिलांना सुरक्षा द्यायला आपण असमर्थ ठरत आहोत’, अशी खंत बोलून दाखवली. सरकार म्हणून मी जबाबदारी झटकत नाही. पण समाजात संस्कार टिकवायला आपण अपयशी ठरलोय. जिजामाता, सावित्रीबाई यांनी देशाला दिशा दिली आणि आज आपल्यावर दिशा कायदा करण्याची वेळ आली आहे’, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -