‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचं निधन

अंधेरीच्या क्रीटी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

rashmi thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे आज निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. अंधेरीच्या क्रीटी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डोंबिवली इथले रश्मी ठाकरे यांचे माहेर आहे. रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाल्याने आजच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचे निधन झाल्या बद्दल दु:ख व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी पत्रात कळवलंय.

रश्मी ठाकरे यांच्या वडिलांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रसेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मीताई ठाकरे यांचे वडील, उद्योजक माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. रश्मीताईंना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


हेही वाचा – विलेपार्ले स्मशानभूमीत संध्याकाळी ४ वाजता सुशांतवर होणार अंत्यसंस्कार