मुंबई: देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’चे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे सध्या युद्धपातळीवर कोस्टल रोडचे काम सुरू आहे. मात्र मच्छीमार बांधवांच्या आक्षेपामुळे वरळी सी लिंक येथे ज्या ठिकाणी ‘कोस्टल रोड’ जोडला जाणार आहे, तेथील नियोजित कामांतबदल करण्यात आल्याने कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात ६०० कोटीने वाढ झाली आहे. त्यातच जीएसटी, वीज वापर व इतर खर्चात वाढ झाल्याने प्रकल्पाचा खर्च १३ हजार ३०० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.
१४ जूनपर्यंत ‘कोस्टल रोड’ ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती ‘कोस्टल रोड’ मंतय्या स्वामी, प्रमुख अभियंता, कोस्टल रोड यांनी दिली आहे. तसेच, नोव्हेंबर २०२३ पर्यंत ‘कोस्टल रोड’ चे मारिन ड्राइव्ह ते वरळी या दरम्यानचे काम पूर्ण झाल्यावर एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र वरळी येथे सी लिंकला कोस्टल रोड जोडण्याच्या कामात काही तांत्रिक बदल केले गेल्याने सदर काम पूर्ण होण्यास मे २०२४ उजाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘कोस्टल रोड’मुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. इंधन खर्चात ३४ टक्के व ७० टक्के वेळेत ७० टक्के बचब होणार आहे. ध्वनी व वायू प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. ७० हेक्टर हरितक्षेत्र उपलब्ध होणार आहे. उद्याने, सायकल ट्रॅक , जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, चार ठिकाणी मिळून १,८०० वाहनांसाठी वाहन पार्किंग उपलब्ध होणार आहे. ‘कोस्टल रोड’ च्या कामात वाहनांसाठी दोन टनेल तयार करण्यात आले आहेत.
‘कोस्टल रोड’ची चांगली देखभाल केल्यास पुढील १०० वर्षे टिकणार
‘कोस्टल रोड’ चे बांधकम हे समुद्राचे खारे पाणी, खारी हवा, समुद्री भरती, उंच लाटांचा जोर, सुनामी,चक्रीवादळ, समुद्र किनाऱ्यालगतची जमीन आदींचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास व डिझाईन करून, त्याप्रमाणे करण्यात येत आहे. या बांधकामावर सतत लक्ष दिले जात आहे. तसेच, हा पूल उभारल्यावर त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने केल्यास, वेळच्यावेळी रंगरंगोटी केल्यास पुढील १०० वर्षे तरी ‘कोस्टल रोड’ चे बांधकाम टिकेल, असा आत्मविश्वासही प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी व्यक्त केला आहे.
‘कोस्टल रोड’चे खरे शिल्पकार ६,५०० अभियंते, अधिकारी, कामगार
आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाल हा खरे तर हजारो कामगारांनी बनवला मात्र नाव झाले शाहजाहचे, उंच इमारती खरे कामगार बनवितात मात्र नाव होते प्रसिद्ध बिल्डरचे तद्वत च मुंबईतील १३ हजार कोटींचा व १०.५८ किमी लांबीचा ‘कोस्टल रोड’ हा खरेतर ५,५०० कामगार व एक हजार अभियंते, अधिकारी यांच्या पुढाकाराने बनवला जात असून नाव मात्र मुंबई महापालिकेचे होत आहे. खरी मेहनत तर दिवसरात्र राबणाऱ्या कामगारांची आहे.
टनेलमध्ये आपत्कालीन घटना घडल्यास उपाययोजना
‘कोस्टल रोड’ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते प्रिन्सेस स्ट्रीट या दरम्यान एक येण्यासाठी व दुसरा जाण्यासाठी असे दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. या बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात चालू आहे. बोगद्यात काही आपत्कालीन घटना घडल्यास एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी आपत्कालीन मार्ग वाहने व नागरिक यांच्यासाठी अगोदरच तयार करण्यात आलेला आहे. आग लागल्यास अग्निरोधक यंत्रणेची तजवीज करण्यात आली आहे. प्रत्येक टनेलमधून वाहतुकीसाठी तीन लाईन असणार आहेत. तर टनेल बाहेरील रस्त्यावरून ये – जा करण्यासाठी एका बाजूने चार तर दुसऱ्या बाजूने चार लाईन असणार आहेत. मात्र टनेलमधील तीन पैकी एक लाईन रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या व बेस्ट बस यांसाठी स्वतंत्र लाईन असणार आहे, अशी माहिती मंतय्या स्वामी, प्रमुख अभियंता यांनी दिली. तसेच, टनेल बाहेरून वाहनांसाठी ताशी ८० – १०० किमी वेग मर्यादा असणार आहे तर टनेलमधून वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग मर्यादा असणार आहे. सध्या टनेलमध्ये फायरबोर्ड लावण्याचे काम व रस्त्याचे आणि पूल उभारणीची कामे सुरू आहेत.
१६ ठिकाणी फ्लड गेट
कोस्टल रोड प्रकल्पाच्या अंतर्गत समुद्राचे पाणी रस्त्यावर येऊ नये व त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सदर कोस्टल रोडवर १६ ठिकाणी फ्लड गेट लावण्यात येत आहेत. १६ पैकी १४ ठिकाणी गेट लावण्याची कामे करण्यात आली आहेत. तर उर्वरित २ ठिकाणी गेट लावण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. या फ्लड गेटमुळे समुद्रातील पाणी भरतीच्या वेळी रोखले जाईल, असे कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी सांगितले.
कोस्टल रोड कामात सागरी जिवांची काळजी
कोस्टल रोड कामाच्या अंतर्गत समुद्रातील सागरी जिवांनाची विषेश काळजी घेऊन त्यांना जपण्याचे कामही पालिका प्रशासनाकडून केले जात आहे. पालिकेने आतापर्यंत केलेल्या कोस्टल रोडच्या कामांचे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशिनोग्राफिने निरीक्षण करून एक अहवाल तयार केला असून त्यामध्ये, कोस्टल रोडवर समुद्राच्या बाजूने लावलेल्या महाकाय दगडांमध्ये सागरी जीव वाढत असून त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आल्याचे समजते. आगामी काळात दहा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘आर्टिफिशीअल रीफ’ही बसवण्यात येणार आहे.