Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE मुंबईत Cocktail Antibodiesचा प्रयोग यशस्वी,सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात २०० पेक्षा अधिक रुग्‍णांवर उपचार

मुंबईत Cocktail Antibodiesचा प्रयोग यशस्वी,सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात २०० पेक्षा अधिक रुग्‍णांवर उपचार

कॉकटेल अँटीबॉडीज दिल्‍यानंतर अवघ्‍या ४८ तासांतच रुग्‍णांना ताप येणे थांबले.

Related Story

- Advertisement -

कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग आल्यानंतर  पालिकेकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संंपूर्ण तयारी केली आहे.  यामध्‍ये आता भर पडली आहे ती कॅसिरीव्‍हीमॅब (Casirvivmab)  आणि इमडेव्‍हीमॅब (Imdevvimab)  या कॉकटेल अँटीबॉडीजची. अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात आतापर्यंत सुमारे २०० पेक्षा अधिक रुग्‍णांवर या पद्धतीने उपचार करण्‍यात आले असून हा प्राथमिक प्रयोग यशस्‍वी ठरला आहे. (Cocktail antibodies tested successfully in Mumbai, more than 200 patients treated at Seven Hills Hospital) या कॉकटेल अँटीबॉडीज दिल्‍यानंतर फक्‍त एकाच (०.५ टक्‍के) रुग्‍णास ऑक्सिजनची गरज भासली तर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल ७० टक्‍के घट झाली आहे. एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी १३ ते १४ दिवसांवरुन कमी होवून आता ५ ते ६ दिवसांवर आला आहे.

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना दिली होत्या कॉकटेल अँटीबॉडीज

कोविड बाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर २०२० पासून कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब कॉकटेल अँटीबॉडीजचा उपयोग करण्‍यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोविड बाधित झाल्‍यानंतर त्‍यांना देखील या कॉकटेल अँटीबॉडीज देण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये अत्‍यंत वेगाने सुधारणा झाली. भारतामध्‍ये अलीकडेच म्‍हणजे दिनांक १० मे २०२१ रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे (Central Drugs Standard Control Organisation) या औषधांची नोंदणी होवून भारताचे औषधी महानियंत्रक (Drugs Controller General of India) यांनी त्‍यास मान्‍यता दिली आहे.

- Advertisement -

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब कॉकटेल अँटीबॉडीज (antibodies medicine) आहेत. या कॉकटेल अँटीबॉडीज (cocktail) वापर करुन कोविड बाधितांवर उपचार केले जाऊ शकतात. ज्‍यांचे वय १२ वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन ४० किलोपेक्षा जास्‍त आहे अशा बाधित रुग्‍णांना हे औषध दिले जाते. सौम्‍य ते मध्‍यम (mild to moderate) स्‍वरुपात ज्‍यांना कोविडची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्‍याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्‍णांना कॉकटेल अँटीबॉडीज दिले जातात. महत्‍त्‍वाचे म्‍हणजे मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्‍यासारखे श्‍वसनाचे इतर तीव्र आजार, उच्‍च रक्‍तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्‍याधी इत्‍यादी आजार असले तरीही उपचार करणे शक्‍य होते.

या १९९ रुग्‍णांमध्‍ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील १०१ रुग्‍ण, ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील ४५ रुग्‍ण तर ६० वर्ष वयोगटावरील ५३ रुग्‍णांचा समावेश आहे. एकूण १९९ पैकी ७४ जणांना किमान एक तरी सहव्‍याधी आहे. सर्व १९९ रुग्‍ण सौम्‍य ते मध्‍यम बाधा या गटातीलच होते. उपचार सुरु करतेवेळी या १९९ बाधितांपैकी १७९ जणांना ताप, १५८ जणांना तापासह खोकला किंवा ताप नसला तरी खोकल्‍याचा त्रास होत होता. तसेच ४ रुग्‍णांना प्राणवायू (ऑक्‍स‍ि‍जन) पुरवठा करावा लागणार होता. एचआरसीटी चाचणीनुसार वर्गीकरणाचा विचार करता रुग्‍णांचा सरासरी एचआरसीटी स्‍कोअर २५ पैकी ७ ते ८ इतका होता. सर्वाधिक एचआरसीटी स्‍कोअर २५ पैकी ११ इतका होता.

- Advertisement -

उपचार अंती प्राप्‍त निष्‍कर्षांचा विचार करता, कॉकटेल अँटीबॉडीज देण्‍यात आलेल्‍या बाधितांना रुग्‍णालयात ५ ते ६ दिवसच उपचार घ्‍यावे लागले. त्‍या तुलनेत इतर औषधी घेतलेल्‍या, पहिल्‍या व दुसऱया लाटेतील रुग्‍णांना १३ ते १४ दिवस रुग्‍णालयात राहावे लागत होते. रुग्‍ण लवकर बरे होत असले तरी औषधांचे परिमाण अभ्‍यासण्‍यासाठी तसेच रुग्‍णांच्‍या प्रकृतीवर देखरेख ठेवता यावी, यासाठी त्‍यांना अधिकचा काळ रुग्‍णालयात ठेवण्‍यात आले.

निरीक्षण अंती असे लक्षात आले की, कॉकटेल अँटीबॉडीज दिल्‍यानंतर अवघ्‍या ४८ तासांतच रुग्‍णांना ताप येणे थांबले. १९९ पैकी फक्‍त एकाच व्‍यक्‍तीला पुढे ऑक्सिजन पुरवठा करावा लागला. हे प्रमाण अवघे ०.५ टक्‍के आहे. कोविड बाधितांना एरवी ऑक्सिजन भासणारी निकड पाहता, ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. कारण पहिल्‍या व दुसऱ्या लाटेमध्‍ये किमान २० टक्‍के रुग्‍णांना ऑक्सिजन द्यावा लागत होता. तर ५ टक्‍के रुग्‍णांना ICU मध्ये उपचार द्यावे लागले. सर्वात महत्‍त्‍वाचे म्‍हणजे कोणत्‍याही रुग्‍णावर कॉकटेल अँटीबॉडीजचे साईड इफेक्‍टस् आढळलेले नाहीत. तसेच मृत्‍यूंचे प्रमाण देखील तब्‍बल ७० टक्‍क्‍यांनी घटले आहे.


हेही वाचा – corona third wave : कोरोनाची तिसरी लाट रोखणे शक्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

- Advertisement -