Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील महाविद्यालये बंदच

मुंबईतील महाविद्यालये बंदच

20 फेब्रुवारीनंतर मुंबई महापालिका घेणार निर्णय

Related Story

- Advertisement -

शाळांप्रमाणे महाविद्यालयेही सुरू करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार 15 फेब्रुवारीपासून राज्यात महाविद्यालये सुरू होणार असली तरी मुंबईमध्ये महाविद्यालये सुरू करण्यासाठी पालिकेने रेड सिग्नल दिला आहे. त्यामुळे तुर्तास तरी मुंबईतील महाविद्यालये सुरू होणार नाहीत.

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व विद्यापीठांना दिले होते. मात्र, महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने तयारी सुरू केली असली तरी मुंबई महापालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास विद्यापीठाला रेड सिग्नल दिला आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात पालिकेकडे विचारणा केली असता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत सध्या महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. आम्ही कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आढावा घेत आहोत, त्यानंतर पुढील निर्णय कळवण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे तुर्तास तरी मुंबईतील महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबईतील महाविद्यालये बंद राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यास पालिकेकडून रेड सिग्नल दिला असताना आता महाविद्यालये सुरू करण्यासही मुंबई महापालिकेने रेड सिग्नल दिला आहे. दरम्यान यासंदर्भात ठाणे व नवी मुंबई महापालिकांकडेही विचारणा केली असून, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगानेही योग्य ती काळजी घेत महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला नव्हता. परंतु राज्यातील शाळा टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत असून, प्रथम नववी ते बारावीचे वर्ग व त्यानंतर चौथी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचार राज्य सरकारने सुरू केला होता. त्यानुसार 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठाना दिले होते.

- Advertisement -