घरमनोरंजनकॉमेडीचा बादशाह विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

कॉमेडीचा बादशाह विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

Subscribe

अस्सल विनोदांमधून रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज निधन.

ज्येष्ठ अभिनेता आणि कॉमेडीचे बादशाह विजय चव्हाण यांचे निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा वरद चव्हाण असे कुटुंबीय आहेत. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी आज  पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांना फुफ्फुसाचा आजार असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी १२ वाजता मुलुंड येथे त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारली आहे. “मोरूची मावशी” या नाटकातील मावशीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरांत पोहचलेल्या विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

टुरटुर या तुफान लोकप्रिय नाटकाने विजय चव्हाण यांनी आपल्या करिअरची सुरवात केली आणि त्यानंतर पुढे अनेक वर्ष अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. मात्र सुयोग संस्थेच्या मोरूची मावशी या नाटकातील त्यांच्या इरसाल भूमिकेमूळे त्यांना खरी ओळख मिळाली. या नाटकाचे सुमारे २००० प्रयोग झाले. या नाटकातील टांग टिंग टिंगा या गाण्यावरील त्यांचे नृत्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. विनोदी असो वा चरित्र भूमिका विजय चव्हाण यांनी आपली प्रत्येक भूमिका समरसून केली. माहेरची साडी, येऊ का घरात, जत्रा,थरथराट, अशी असावी सासू ,घोळात घोळ,आली लहर केला कहर असे त्यांचे गाजलेले मराठी सिनेमे . हयवदन,टुरटुर,मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत ही त्यांची काही गाजलेली नाटकं होती. रानफूल,लाइफ मेंबर या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या होत्या.

- Advertisement -

विजय चव्हाण यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. विजय हा एक उत्तम नट तर होताच मात्र त्या अगोदर तो माझा जवळचा मित्र होता. माझ्याबरोबर अनेक चित्रपटातून त्याने काम केले होते. प्रत्येकवेळी त्याने आपल्या कामाची एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली. स्वतःच्या वेगळ्या अभिनय कौशल्याने त्याने स्वतःचा एक चहाता वर्ग निर्माण केला होता. – जेष्ठ अभिनेता अशोक सराफ

 

- Advertisement -


विजय चव्हाण यांची गाजलेली नाटकं

– टुरटुर
– मोरूची मावशी
– कार्टी प्रेमात पडली
– हयवदन
– श्रीमंत दामोदरपंत
– देखणी बायको दुसऱ्याची

विजय चव्हाण यांचे गाजलेले सिनेमे 

– माहेरची साडी
– अशी असावी सासू
– जत्रा
– येऊ का घरात
– घोळात घोळ

विजूमामांबद्दल अधिक माहिती

कांदा संस्थानची महाराणी, चिरतरुण ‘मोरूची मावशी’ अर्थात ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना नुकताच त्यांना राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर झाला होता. या मोरूच्या मावशीने ८० च्या दशकापासून मराठी रंगभूमीच्या अस्सल प्रेक्षकांना आणि निस्सिम चाहत्यांना आजतागायत हसवत ठेवले.आचार्य अत्र्यांची कसदार लेखणी, अशोक पत्कींचं ठेका धरायला लावणारं श्रवणीय संगीत, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन यांची उत्तम साथ आणि दोन अडीच तास संपूर्ण रंगमंच आणि असंख्य प्रेक्षकांची मनं अक्षरशः काबीज करणाऱ्या मावशीचा सफाईदार, देखणा वावर. हे नितळ देखणं नाटक मावशी जगणाऱ्या विजय चव्हाण अर्थात आपल्या सगळ्यांच्या विजूमामांनी अजरामर करून ठेवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -